2000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले रोमन शहर पुन्हा येणार जगासमोर Pudhari File Photo
विश्वसंचार

2000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले रोमन शहर पुन्हा येणार जगासमोर

ज्वालामुखीने नष्ट झालेल्या ‘एनेरिया’चे अवशेष पर्यटकांसाठी खुले

पुढारी वृत्तसेवा

रोम : इटलीमध्ये 2000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडून नष्ट झालेले एक शहर पुन्हा जगासमोर येत आहे. ‘एनेरिया’ नावाच्या या शहराला ज्वालामुखीने उद्ध्वस्त केले होते. इटलीच्या इस्चिया बेटावर इ.स. 180 मध्ये क्रेटियो ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, ज्यामुळे हे रोमन बंदर शहर समुद्रात गडप झाले. आता पाण्याखालील पर्यटन आणि सुरू असलेल्या उत्खननामुळे या शहराचा आकर्षक इतिहास पुन्हा एकदा समोर येत आहे.

पुरातत्त्वीय उत्खनन आणि पाण्याखालील पर्यटनाद्वारे हे शहर पुन्हा प्रकाशात आणले जात आहे. कार्टारोमाना खाडीत असलेले हे अवशेष पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत. त्यामुळे काचेच्या तळाच्या बोटीतून किंवा स्नॉर्कलिंगद्वारे पर्यटक हे ठिकाण पाहू शकतात. येथे प्राचीन घाट, रोमन कलाकृती आणि समुद्राच्या तळाशी जतन केलेल्या दगडी रचना स्पष्टपणे दिसतात. या शहराचे पहिले पुरावे 1970 च्या दशकात मिळाले, जेव्हा काही पाणबुड्यांना इस्चियाच्या किनार्‍यावर मातीची भांडी आणि काही धातूचे तुकडे सापडले; मात्र तेव्हा या शोधाला गती मिळाली नाही.

2011 मध्ये स्थानिक नाविक आणि इतिहासप्रेमींना मोठे यश मिळाले, जेव्हा समुद्राच्या तळापासून दोन मीटर खाली दबलेल्या विशाल रोमन घाटाचे अवशेष सापडले. त्यानंतर येथे अँफोरा (एक प्रकारचे भांडे), मोझाइक, नाणी, समुद्राकिनारी असलेल्या व्हिलाचे अवशेष आणि एक लाकडी रोमन जहाजही सापडले. प्राचीन काळी इस्चिया हे बेट ग्रीक अधिपत्याखाली होते आणि तेथील गरम पाण्याच्या झर्‍यांसाठी प्रसिद्ध होते. इ.स. पूर्व 322 मध्ये रोमन साम्राज्याने ताबा मिळवल्यानंतर या बेटाचे नाव ‘एनेरिया’ ठेवण्यात आले. या नावाचा उल्लेख प्लिनी द एल्डर आणि स्ट्रॅबो यांसारख्या इतिहासकारांच्या ग्रंथांमध्येही आढळतो. मात्र, आतापर्यंत या रोमन वस्तीचे प्रत्यक्ष भौतिक पुरावे दुर्मिळ होते, जे आता समोर येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT