विश्वसंचार

130 किलो आटा, 185 किलोची रोटी!

Arun Patil

भिलवाडा : 130 किलो आटा, 10 किलो मैदा वापरून भिलवाडा येथे तब्बल 185 किलो वजनाची रोटी तयार करण्यात आली आणि सर्वांचे डोेळे याने विस्फारले नसते तरच नवल होते. ही रोटी खास भट्टीत भाजण्यात आली. या सर्व प्रक्रियेसाठी थोडाथोडका नव्हे तर पाच तासांचा अवधी लागला. हा विक्रम आता गिनीज आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला जावा, यासाठी रीतसर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

शहरातील हरिशेवा धाम परिसरत सकाळी सव्वाअकराच्या सुमारास तूप आणि कापराने अग्निप्रज्वलित केले गेले. त्यानंतर 130 किलो आटा व 10 किलो मैदा मळला गेला. वीस फुटांच्या मोठ्या पात्रात पाच जणांनी ही रोटी लाटली आणि 2 हजार विटांनी तयार केलेल्या भट्टीवर ती भाजली गेली. यासाठी 1 हजार किलो कोळसा वापरण्यात आला. अखेर सायंकाळी पावणेपाच वाजता ही रोटी तयार करण्यात आली.

रोटी करपू नये, यासाठी पात्राच्या चारही बाजूंनी तेल व तूपाची धार देण्यात आली. रोटीसाठी 15 किलो तूप आणि 10 किलो तेल वापरण्यात आले. रोटी तयार झाल्यानंतर वजन करण्यात आले, त्यावेळी ते 185 किलो इतके भरले. विविध राज्यांतील बल्लवाचार्य यात सहभागी झाले. रोटी तयार झाल्यानंतर त्याचे तुकडे करून पंचकुटा भाजीसह ती प्रसाद रूपाने वाटण्यात आली. रोटी तयार करण्याची ही प्रक्रिया चित्रीत केली गेली. त्याचा व्हिडीओदेखील पाहता पाहता व्हायरल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT