मॉस्को : इतिहासाच्या पुस्तकात ज्या ‘निएंडरथल’ मानवाला केवळ शिकारी आदिमानव म्हणून दाखवले जाते, तो प्रत्यक्षात एक प्रगत वैद्यकीय तज्ज्ञदेखील होता. सैबेरियात सापडलेल्या 60,000 वर्षे जुन्या एका दाताने शास्त्रज्ञांना चकित केले असून, निएंडरथल मानव आधुनिक मानवाच्या 40,000 वर्षे आधीपासूनच ‘डेंटिस्ट्री’ (दंतवैद्यकशास्त्र) जाणत होता, हे आता सिद्ध झाले आहे.
सैबेरियातील ‘चाग्यर्स्काया गुफा’ येथे एका प्रौढ निएंडरथल मानवाचा खालच्या जबड्याचा दात सापडला. रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी जेव्हा या दाताची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली, तेव्हा त्यात एक असामान्य छेद आढळला. हा छेद नैसर्गिक सडण्यामुळे झालेला नसून, एखाद्या अणकुचीदार दगडाच्या अवजाराने जाणीवपूर्वक केलेला होता. वैज्ञानिक विश्लेषणातून असे समोर आले आहे की, त्या निएंडरथल व्यक्तीला दाताचा प्रचंड संसर्ग आणि वेदना होत असाव्यात. या वेदनेतून सुटका करण्यासाठी कबिल्यातील दुसर्या व्यक्तीने दगडाच्या अवजाराने दातातील संसर्ग झालेला भाग घासून बाहेर काढला.
ही प्रक्रिया आजच्या ‘रूट कॅनॉल’ उपचार पद्धतीशी मिळतीजुळती आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी केवळ अवजारांचीच नव्हे, तर मानवी शरीराची आणि वेदना निवारण्याची खोल समज असणे आवश्यक आहे. विना भूल देता दातात छेद करणे अत्यंत वेदनादायक असते. यासाठी रुग्णाचा उपचारावर आणि ते करणार्या व्यक्तीवर असलेला अढळ विश्वास दिसून येतो. हे त्या काळातील विकसित सामाजिक व्यवस्था आणि एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, आधुनिक मानवाने 10 ते 15 हजार वर्षांपूर्वी दातांचे उपचार सुरू केले. मात्र, या नवीन शोधामुळे हे स्पष्ट झाले आहे की, निएंडरथल मानवाने 60,000 वर्षांपूर्वीच हे कौशल्य आत्मसात केले होते.