रोम : इटलीची राजधानी रोममध्ये मेट्रोचे खोदकाम करताना चक्क 3000 वर्षांपूर्वीचा इतिहास गवसला आहे. रोममधील मेट्रो सी या नवीन मार्गिकेच्या कामात प्राचीन रोमन साम्राज्याचे अवशेष सापडले असून, प्रशासनाने या स्थानकांचे रूपांतर चक्क एका अॅर्किओ-स्टेशन म्हणजेच पुरातत्त्व संग्रहालयात केले आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या कोलोसिओ-फोरी इम्पेरियाली या मेट्रो स्थानकात प्रवेश करताच प्रवाशांना आधुनिक अभियांत्रिकी आणि प्राचीन संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. स्थानकात जागोजागी उत्खननात सापडलेली प्राचीन मातीची भांडी काचेच्या कपाटात प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. प्रवाशांना एस्केलेटरने खाली जाताना चक्क प्राचीन रोमन काळातील स्नानगृहाचे (रोमन बाथ) अवशेष पाहायला मिळतात. कोणत्याही म्युझियमचे महागडे तिकीट न काढता, केवळ 1.50 युरो (सुमारे 135-140 रुपये) या मेट्रोच्या तिकीट दरात प्रवाशांना या प्राचीन आकर्षणांचा आनंद घेता येत आहे. रोममध्ये मेट्रो बांधणे हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक मानले जाते. इतर शहरांमध्ये मेट्रोसाठी खडक फोडले जातात; पण रोममध्ये प्रत्येक फुटावर इतिहास दडलेला आहे.