लंडन : होमरचे ‘इलियड’ हे महाकाव्य पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामध्ये एका भव्य लाकडी घोड्यामधून लपून आलेल्या सैनिकांनी ट्रॉयचा कसा पाडाव केला याचे कथानक आहे. ब्रिटनमध्ये नुकत्याच सापडलेल्या एका रोमन मोझॅकने (चित्राकृती फरशी) ‘ट्रोजन युद्ध’ या प्रसिद्ध पौराणिक कथेची एक दीर्घकाळ हरवलेली आवृत्ती दर्शविली आहे, जी या महाकाव्याच्या सर्वात लोकप्रिय कथानकापेक्षा वेगळी आहे.
‘केटॉन मोझॅक’ म्हणून ओळखली जाणारी ही कलाकृती ट्रोजन युद्धातील एका प्रमुख संघर्षाचे चित्रण करते. परंतु, संशोधकांच्या नवीन अहवालानुसार, ही कथा होमरच्या ‘इलियड’ या जगप्रसिद्ध आणि चिरस्थायी आवृत्तीवर आधारित नाही. याऐवजी, या मोझॅकची प्रेरणा एस्किलस या अथेनियन नाटककाराच्या एका दुर्मीळ शोकांतिकेमधून घेतली गेली आहे. ‘फ्रिजियन्स’ नावाचे हे नाटक इसवी सन पूर्व पाचव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिले गेले होते आणि ते आज फक्त काही तुकड्यांमध्ये आणि इतर प्राचीन कामांमध्ये केलेल्या विश्लेषणात उपलब्ध आहे.
सुमारे 33 फूट बाय 17 फूट (10 बाय 5.3 मीटर) मापाची ही मोझॅक कलाकृती एका मोठ्या व्हिलामधील ‘ट्रायक्लिनियम’ किंवा जेवणाच्या खोलीच्या फरशीचा भाग असावी. ही मोझॅक इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून वापरात होती. होमरच्या ‘इलियड’नुसार, ट्रॉयच्या पॅरिसने स्पार्टाची सुंदर राणी हेलनचे अपहरण केल्यानंतर ग्रीक लोकांनी तिला परत मिळवण्यासाठी दहा वर्षे ट्रॉय शहराशी लढा दिला. या मोझॅकवर ग्रीक नायक अकिलिस आणि ट्रोजन राजकुमार हेक्टर यांच्यातील संघर्षाची तीन द़ृश्ये कोरलेली आहेत: पहिल्या द़ृश्यात, हेक्टरने अकिलिसचा जवळचा मित्र पॅट्रोक्लसला मारल्यानंतर दोघांमध्ये द्वंद्व युद्ध होताना दाखवले आहे.
दुसर्या द़ृश्यात, अकिलिस हेक्टरच्या मृतदेहाला आपल्या रथामागे फरफटत नेत आहे आणि तिसर्या द़ृश्यात, अकिलिस हेक्टरचे शरीर त्याचे वडील राजा प्रायम यांना त्याच्या वजनाइतके सोने घेऊन परत करत आहे. सुरुवातीला संशोधकांना वाटले की हे द़ृश्य होमरच्या ‘इलियड’वर आधारित आहे. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ लीसेस्टरच्या इतिहासकार आणि या अभ्यासाच्या मुख्य लेखिका जेन मासेग्लिया यांना बारकाईने तपासणी केल्यावर आढळले की मोझॅकमधील काही तपशील होमरच्या कथेपेक्षा वेगळे आहेत.
ब्रिटानिया जर्नलमध्ये 3 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासात मासेग्लिया आणि त्यांच्या सहकार्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, यातील फरक ‘फ्रिजियन्स’ हे नाटक या दृश्यांसाठी प्रेरणास्रोत असल्याचे दर्शवतात. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथील पुरातत्वशास्त्रज्ञ हेला एक्खार्डट् यांनी या संशोधनावर प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘हे एक रोमांचक संशोधन आहे. ग्रीक नायक अकिलिस आणि हेक्टर यांच्या कथा केवळ ग्रंथांमधूनच नाही, तर कलाकारांनी तयार केलेल्या प्रतिमांच्या माध्यमातूनही कशा प्रसारित झाल्या, हे स्पष्ट होते.’