लंडन : रोमन साम्राज्याच्या काळातील एक गूढ अंत्यविधी म्हणजे मृतांच्या शरीरावर ‘द्रवरूप जिप्सम’ (प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखा पदार्थ) ओतणे. आतापर्यंत असा समज होता की, ही प्रथा केवळ उच्चभ्रू प्रौढ व्यक्तींसाठीच मर्यादित होती. मात्र, एका नवीन संशोधनाने हा समज मोडीत काढला असून, अगदी 1 महिन्याच्या बाळांवरही असे अंत्यसंस्कार केले जात असल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत.
‘सीइंग द डेड’ या प्रकल्पांतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि यॉर्क म्युझियम ट्रस्टच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या विचित्र प्रथेमध्ये: मृतदेहाला दगडी किंवा शिशाच्या शवपेटीत ठेवले जात असे. त्यानंतर त्यावर द्रवरूप जिप्सम ओतले जाई. हा पदार्थ शरीराभोवती घट्ट झाल्यामुळे मृतदेहावरील महागड्या कपड्यांचे अवशेष आणि शरीराच्या खुणा आजही जतन झाल्या आहेत. रोमन काळातील जुन्या नोंदीनुसार, 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यास बंदी होती. कारण, त्यावेळी बालमृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांहून अधिक होते. मात्र, उत्तर इंग्लंडमधील ‘यॉर्क’ येथे सापडलेल्या या थडग्यांनी इतिहासकारांना चकित केले आहे.
‘इतिहासात जरी सार्वजनिक शोकावर बंदी असल्याचे म्हटले असले, तरी कुटुंबाचे वैयक्तिक दुःख आणि आपल्या बाळाप्रती असलेले प्रेम यांतूनच असे उच्च दर्जाचे अंत्यसंस्कार केले गेले असावेत,’ असे रोमन पुरातत्त्वशास्त्रज्ञ मॉरीन कॅरोल यांनी स्पष्ट केले. कॅरोल यांनी अभ्यासलेल्या 70 पेक्षा जास्त जिप्सम दफनांपैकी किमान सात ही लहान मुलांची होती. यात 4 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या तीन बाळांचा समावेश आहे. सामान्यतः त्या काळी लहान मुलांना साध्या मातीच्या रांजणांमध्ये किंवा लाकडी पेट्यांमध्ये पुरले जात असे. मात्र, जिप्समचा वापर केल्याने हे स्पष्ट होते की, ही मुले यॉर्कमधील अति-उच्चभ्रू कुटुंबातील असावीत. हे संशोधन सिद्ध करते की, प्राचीन रोमन समाजातही पालकांचे आपल्या मृत मुलांबद्दलचे प्रेम नियमांपेक्षा मोठे होते.