ग्लासगो (स्कॉटलंड): स्कॉटलंडमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी रोमन काळातील एका महत्त्वपूर्ण ‘लष्करी चौकी’चा (Fortlet) शोध लावला आहे. ही चौकी रोमन सम्राट अँटोनाइनस पायस (शसन काळ इ.स. 138 ते 161) यांच्या आदेशानुसार बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘अँटोनाइन वॉल’ या संरक्षक भिंतीच्या शेजारी उभारण्यात आली होती.
अँटोनाइन वॉल ही 38 मैल (62 कि.मी.) लांब मातीची आणि गवताची भिंत होती, जी रोमन साम्राज्याच्या ताब्यात असलेल्या दक्षिण स्कॉटलंडला उत्तर स्कॉटलंडपासून वेगळे करण्यासाठी इ.स. 142 मध्ये बांधली गेली होती. या भिंतीवर किल्ले, छावण्या, स्नानगृहे आणि लष्करी रस्ते होते, जेणेकरून रोमन सैन्याला रसद पुरवणे सोपे व्हावे. इ.स. 165 च्या सुमारास रोमन सैन्याने माघार घेतल्यावर ही भिंत सोडून देण्यात आली होती.
पुरातत्त्व संस्था गार्ड आर्किओलॉजने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन चौकी ग्लासगोच्या वायव्येस सुमारे 5 मैलांवर असलेल्या बियर्सडेन शहरात सापडली आहे. विशेष म्हणजे, ही चौकी तीन खासगी घरांच्या बागांच्या परिसरात असलेल्या उंचावर सापडली आहे. रेडिओकार्बन डेटिंगनुसार, ही चौकी दुसरी ते तिसरी शताब्दी या काळातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चौकी एका दगडी पायावर बांधली होती आणि तिच्या संरक्षणासाठी भोवती खंदक खोदलेला होता. संशोधकांच्या मते, या चौकीतून उत्तर दिशेला (रोमन सत्तेच्या बाहेरील प्रदेश) स्पष्टपणे नजर ठेवता येत असे.
शत्रूची हालचाल दिसल्यास नजीकच्या मोठ्या रोमन किल्ल्याला संकेत देण्यासाठी या चौकीचा वापर होत असे. अशा चौक्यांमध्ये साधारणपणे 20 ते 50 सैनिक एका वेळी राहू शकत असत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या चौकीची एक डिजिटल प्रतिकृती देखील तयार केली आहे, ज्यामध्ये सैनिकांच्या निवासासाठी दोन इमारती, दोन टेहळणी बुरूज आणि संरक्षक भिंती दिसत आहेत. 2017 मध्ये एका घराच्या बांधकामापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान या चौकीचा पहिला पुरावा सापडला होता, ज्याचा सविस्तर अहवाल आता ‘आर्किओलॉजी रिपोर्टस् ऑनलाईन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.