मंगळावर दिसला ‘कोळ्याच्या अंड्यां’सारखा खडक 
विश्वसंचार

मंगळावर दिसला ‘कोळ्याच्या अंड्यां’सारखा खडक

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स मार्स रोव्हरने आपल्याच नजरेच्या कोपर्‍यातून एक अनोखी वस्तू पाहिली आहे, एक रहस्यमय खडक, जो कोळ्याच्या शेकडो अंड्यांच्या गाठीसारखा दिसतो. हा खडक जेजेरो क्रेटरच्या कड्यावर असलेल्या ‘विच हेजल हिल’च्या उतारांवर आढळला असून, तो लालसर वाळूने थोडा झाकलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरात उठून दिसतो.

या खडकाला पर्सिव्हरन्स टीमने ‘सेंट पॉल्स बे’ असे नाव दिले आहे. तो एक ‘फ्लोट रॉक’ आहे, म्हणजेच ती ज्या ठिकाणी सापडला आहे तिथे निर्माण झालेला नाही. त्यामुळे, त्याची विलक्षण रचना स्पष्ट करणारे संदर्भ नासाच्या शास्त्रज्ञांना मिळालेले नाहीत. हा खडक मूळ जागेवरून हलवला गेला आहे आणि त्याचे स्थानांतर मंगळाच्या भूवैज्ञानिक हालचालींबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकते. कदाचित हा खडक एखाद्या उल्कापाताच्या वेळी तयार झाला असेल. उल्कापातामुळे मंगळाच्या पृष्ठभागावर असलेला दगड वाफ होऊन लहान दाणेदार स्वरूपात जमा झाला असावा. जर असे झाले असेल, तर हा खडक मूळ ठिकाणाहून खूप लांब प्रवास करून आला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उल्कापात कसा पदार्थ हलवतो, यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो. नासाच्या अंदाजानुसार, हा खडक ‘विच हेजल हिल’वरून खाली घसरला असावा. या टेकडीवर उपग्रहांद्वारे पाहिलेल्या गडद थरांपैकी तो एखाद्या थराचा भाग असू शकतो. या गडद थरांचे नेमके स्वरूप काय आहे, हे समजल्यास मंगळावरील ज्वालामुखीचा प्रभाव, प्राचीन उल्कापात, किंवा पूर्वीच्या भूगर्भातील पाण्याचा पुरावा मिळू शकतो. ‘सेंट पॉल्स बे’सारख्या खडकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना मंगळाच्या भूतकाळातील स्थित्यंतरांचा शोध घेता येईल. पाणी, खडक आणि भूगर्भीय शक्ती यांच्या परस्पर संवादातून मंगळावर कधी काळी जीवसृष्टी अस्तित्वात होती का, याबद्दलही उत्तर मिळू शकते. जर ‘विच हेजल हिल’वर पूर्वी भूगर्भीय पाणी असण्याची शक्यता खरी ठरली, तर पर्सेव्हरन्स रोव्हरने गोळा केलेल्या काही खडकांमध्ये जीवाश्म स्वरूपातील सूक्ष्मजीवांचे अवशेष असू शकतात. ‘नासा’च्या 2030च्या दशकात नियोजित ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ मोहिमेद्वारे हे खडक पृथ्वीवर आणले जातील आणि त्यांचे सखोल विश्लेषण केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT