हाँगकाँग : आतापर्यंत रोबोंना थंडी, उष्णता किंवा जखम यांचा अनुभव येत नव्हता; परंतु आता हे चित्र बदलणार आहे. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन न्यूरोमॉर्फिक रोबोटिक त्वचा (एनआरइ-स्किन) विकसित केली आहे. ही त्वचा रोबोला मानवाप्रमाणे शारीरिक वेदनांची जाणीव करून देईल आणि धोक्याची चाहूल लागताच स्वरक्षणार्थ त्वरित प्रतिक्रिया देण्यास सक्षम करेल.
मानवी मज्जासंस्थेवर आधारित तंत्रज्ञान
युयु गाओ आणि त्यांच्या टीमने तयार केलेली ही त्वचा चार थरांची (लेयर) बनलेली आहे. ही त्वचा स्पर्श आणि दाबाचे रूपांतर विजेच्या लहरींमध्ये करते, ज्या अगदी आपल्या नसांमधील लहरींसारख्या असतात. जर कोणी रोबोला प्रेमाने स्पर्श केला, तर ही माहिती रोबोच्या मुख्य प्रोसेसरला दिली जाते. जर दाब एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेला, तर ही त्वचा मेंदूची वाट न पाहता थेट मोटर्सना सिग्नल पाठवते. यामुळे रोबो एखाद्या गरम किंवा अणकुचीदार वस्तूला स्पर्श होताच मानवाप्रमाणे चटकन आपला हात मागे घेतो. या तंत्रज्ञानामुळे फायदे होणार आहेत.
डायरेक्ट सिग्नलमुळे रोबोचा प्रतिसादाचा वेग वाढतो, ज्यामुळे स्वतःचे आणि आसपासच्या लोकांचे नुकसान टळते. या त्वचेतील प्रत्येक सेन्सर सतत एक हलका सिग्नल पाठवत असतो. जर त्वचा कुठून फाटली किंवा कापली गेली, तर तिथला सिग्नल बंद होतो. यामुळे रोबोला जखम नेमकी कुठे झाली आहे, हे त्वरित समजते. ही त्वचा लहान मॅग्नेटिक मॉड्यूल्सची बनलेली आहे. जर त्वचेचा एखादा भाग खराब झाला, तर तो ब्लॉकप्रमाणे बदलणे अत्यंत सोपे आहे. भविष्यातील उपयोग हे तंत्रज्ञान प्रामुख्याने मानवाशी जवळून संपर्क येणाऱ्या सर्व्हिस रोबो आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रोस्थेटिक लिंब्स (कृत्रिम अवयव) साठी मैलाचा दगड ठरेल. यामुळे रोबो अधिक संवेदनशील आणि सुरक्षित होतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.