वॉशिंग्टन : UC सँटा बार्बरा आणि TU ड्रेझ्डेन येथील संशोधकांनी असा रोबोटिक समुदाय विकसित केला आहे, जो गरजेनुसार घनपदार्थासारखा कठीण होतो किंवा पाण्यासारख्या तरल पदार्थांसारखा सैल पडतो. नव्या संशोधनानुसार हे हिवमाईंडसारखे रोबोटस् केवळ सामूहिकपणे कार्य करत नाहीत, तर स्वतःची रचना बदलू शकतात आणि आपल्या शक्तीची पातळीही सुसंगतपणे नियंत्रित करू शकतात.
हे रोबोट साधारणपणे लाटण्यासारख्या आकाराचे असून त्यांचा व्यास केवळ 70 मिमी (2.75 इंच) आहे. त्यांना पॉलिलॅक्टिक अॅसिड या जैवविघटनशील प्लास्टिकचा वापर करून 3 डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आले आहे. प्रत्येक रोबोटच्या तळाशी चुंबक आहे. त्यात पिवळ्या गिअरसह मध्यभागी एक गिअर रिंग आहे. या गिअरद्वारे हे रोबोट एकमेकांवर दाब व ओढ निर्माण करतात, अगदी जिवंत पेशीप्रमाणे. या रोबोटस्नी मिळून एकत्रितपणे रचना तयार केली, स्वतःची दुरुस्ती केली आणि 700 न्यूटन (एका रोबोटच्या वजनाच्या 500 पट) इतका भार पेलू शकतात. ते चुंबकीय बळावर कार्य करतात, ज्यामुळे ते एकमेकांना चिकटून राहतात आणि एकत्रित स्वरूप राखतात.
UCSB चे पीएच.डी. संशोधक मॅथ्यू डेव्हलिन यांनी सांगितले की, हे रोबोट गर्भातील पेशींवरून प्रेरित आहेत, ज्या स्वतःला एकत्र ठेवून एकमेकांना ढकलत व खेचत जीवशास्त्रीय रचना तयार करतात. हे रोबोट मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या षटकोनी ग्रीडमध्ये स्वतःला सजवतात. आठ मोटरयुक्त गिअर एकत्रितपणे आंतर पेशी बलांचे रूपांतर कडेने लागणार्या बळामध्ये करतात, जे रोबोटस्ना एकमेकांभोवती ढकलणे, खेचणे आणि हालचाल करणे शक्य बनवते. संशोधनामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे असा ‘स्मार्ट पदार्थ‘ तयार करणे जो आवश्यकतेनुसार कधी कठीण, कधी मऊ स्वरूप धारण करू शकेल. तसेच हे रोबोटस् केवळ एक विशिष्ट आकार घेतील असे नाही, तर आपल्यालाच नव्या रूपात ‘वाहून’ नेऊ शकतील.