बीजिंग : चीनमधील बीजिंग, शांघाय आणि शेंझेन यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भविष्यातील शहरी व्यवस्थापनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. येथे ट्रॅफिक कंट्रोल, गर्दी नियंत्रित करणे तसेच लोकांना कॉफी आणि अन्य पेये देण्यासारखी कामे रोबोंद्वारे केली जात आहेत.
चीनमधील काही भागांत (उदा. झेजियांग प्रांतातील हांगझोऊ शहर) 'हाँगशिंग नंबर-१' किंवा 'हाँगशिंग नंबर-२' सारख्या प्रगत मानवाकार रोबोंना रस्त्यांवर आणि चौकांमध्ये गस्त घालण्यासाठी उतरवण्यात आले आहे. हे रोबो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), हाय-डिफिंक्शन कॅमेरे, लिडार (LiDAR) आणि सेन्सर्सच्या मदतीने रिअल-टाईममध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवतात. हे आपल्या बुद्धिमत्तापूर्ण व्हॉईस सिस्टमद्वारे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची आठवण करून देतात. चीनमध्ये ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वेगाने विस्तार होत असला, तरी वुहानसारख्या शहरांमध्ये रोबोटॅक्सी किंवा अशा प्रणालींमुळे ट्रॅफिक जाम होण्याच्या तांत्रिक समस्याही समोर आल्या आहेत. तरीही भविष्यातील स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून चीनमध्ये या प्रयोगांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जात आहे.