बीजिंग : चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये रोबोंचा वापर आता केवळ कारखान्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. चीनमधील एका प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये चक्क रोबोंनी स्टेजवर लयबद्ध नृत्य करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. या रोबोंच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चीनचे प्रसिद्ध गायक आणि गीतकार वांग लीहोम यांच्या कॉन्सर्टमध्ये हे द़ृश्य पाहायला मिळाले. ‘यूनीट्री’ कंपनीच्या या रोबोंनी चमकदार सैल पँट आणि तसाच शर्ट परिधान करून अत्यंत स्टायलिश अंदाजात परफॉर्मन्स दिला. हे रोबो कोणत्याही अडथळ्याशिवाय अत्यंत लवचिकपणे हालचाली करताना दिसले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रोबोंचे डान्स स्टेप्स तिथे असलेल्या मानवी डान्सर्सशी इतके तंतोतंत जुळत होते की, जणू ते वर्षांनुवर्षे एकत्र सराव करत आहेत असे वाटत होते. एखाद्या रॉकस्टारसारख्या पोशाखातील या रोबोंचा लूक सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या डान्सचा व्हिडीओ पाहून टेस्ला आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) चे मालक एलन मस्क स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी हा व्हिडीओ पाहून केवळ एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली : ‘इम्प्रेसिव्ह’ (प्रभावी). मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, चीनमध्ये आता रोबो सर्वकाही करत आहेत, अगदी कॉन्सर्टमध्ये व्यावसायिक डान्सर्सप्रमाणे परफॉर्मन्सही देत आहेत. मस्क यांची ही छोटीशी कमेंट आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. चीनमध्ये रोबो आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही वेगाने शिरकाव करत आहेत. या व्हिडीओमुळे भविष्यात स्टेज शोज आणि कॉन्सर्टस्मध्ये तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या स्तरावर जाऊ शकतो, याची झलक पाहायला मिळाली आहे.