Shaolin Temple: चीनमधील शाओलिन मठात रोबो शिकताहेत कुंग फू! Pudhari
विश्वसंचार

Shaolin Temple: चीनमधील शाओलिन मठात रोबो शिकताहेत कुंग फू!

व्हिडीओमध्ये काही ह्युमनॉईड रोबो (मानवासारखे दिसणारे रोबो) चक्क माणसांसोबत मिळून ‌‘कुंग फू‌’चा सराव करताना दिसत आहेत

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन नेहमीच जगाला थक्क करत आला आहे. आता चीनमधून रोबोंचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडीओमध्ये काही ह्युमनॉईड रोबो (मानवासारखे दिसणारे रोबो) चक्क माणसांसोबत मिळून ‌‘कुंग फू‌’चा सराव करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ चीनमधील जगप्रसिद्ध शाओलिन टेंपल येथील आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था CGTN ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाओलिन मठातील भिक्खू आपल्या पारंपरिक मार्शल आर्टस्‌‍च्या हालचाली करत आहेत आणि रोबो अगदी तंतोतंत त्यांची नक्कल करत आहेत. रोबोंची अचूकता, समतोल आणि शिस्त पाहून उपस्थित लोक अवाक्‌‍ झाले. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, रोबो केवळ हालचालींचे अनुकरण करत नाहीत, तर त्यांची ‌‘टायमिंग‌’ आणि बॉडी कंट्रोल एखाद्या सरावलेल्या मार्शल आर्टिस्टप्रमाणे अचूक आहे. हात-पायांच्या हालचाली आणि उभे राहण्याची पद्धत यावर या रोबोंची जबरदस्त पकड दिसून आली.

भविष्यात रोबोंचा वाढता वावर लक्षात घेता, माणूस आणि तंत्रज्ञान एकमेकांशी कसे जुळवून घेऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. चीनमधील रोबोने अशा प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका डान्स स्पर्धेत रोबोने ‌‘बॅकफ्लिप‌’ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चीनमध्ये रोबोंमधील फुटबॉल सामनेदेखील आयोजित केले जातात. आता मार्शल आर्टस्‌‍च्या क्षेत्रातही रोबोंनी मारलेली ही झेप भविष्यातील ‌‘सुपर रोबो‌’ची नांदी मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT