लास वेगास : रोबो आता फक्त कपड्यांच्या घड्या घालत नाहीत, तर शेकडो प्रकारचे पदार्थ स्वतः शिजवत आहेत. रस्त्यांवर ड्रायव्हरशिवाय धावणाऱ्या ‘रोबोटॅक्सी’ उतरल्या आहेत आणि मानवाला भावनिक आधार देण्यासाठी ‘एआय सोबती’ उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठा तंत्रज्ञान सोहळा ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ (CES 2026 ) मध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाची केवळ झलकच नाही, तर त्याचे वास्तव रूप पाहायला मिळाले.
कंझ्युमर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली 6 ते 9 जानेवारी दरम्यान अमेरिकेतील लास वेगासमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. यामध्ये 4,100 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते, ज्यात 1,200 स्टार्टअप्सचा समावेश होता. सीटीएच्या मते, हा कार्यक्रम केवळ सिद्धांतापुरता मर्यादित नसून तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर दाखवणारा ठरला. यावर्षीच्या प्रदर्शनात रोबोटिक्स हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. ह्युमनॉइड रोबो (मानवासारखे दिसणारे रोबो) आता केवळ एका कामापुरते मर्यादित राहिलेले नाहीत.
घरकाम, उद्योग, आरोग्य सेवा, पुरवठा साखळी आणि वाहतूक अशा सर्वच क्षेत्रांत ते मानवाचे साहाय्यक म्हणून समोर आले आहेत. हाँगकाँगमधील ‘सेन्सरोबोट’ कंपनीने त्यांच्या बुद्धिबळ खेळणाऱ्या रोबोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा रोबो केवळ खेळत नाही, तर समोरच्या खेळाडूची चाल चुकल्यास ती सुधारण्यासाठी मार्गदर्शनही करतो. याची एआय व्हिजन आणि डिसिजन इंटेलिजन्स सिस्टीम मिलिमीटरच्या पातळीपर्यंत अचूक काम करते. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने या प्रदर्शनात दिमाखदार पदार्पण केले. ‘इंजिनिअरिंग द फ्युचर, इंटेलिजेंट बाय डिझाइन’ या थीमखाली टीसीएसने आपले सामर्थ्य दाखवले. ऑटोनॉमस मोबिलिटी (स्वयंचलित वाहने), फिजिकल एआय रोबोटिक्स, जेनएआय आधारित वाहन अनुभव आणि सेमीकंडक्टर इंजिनिअरिंग ही तंत्रज्ञाने यामध्ये सादर करण्यात आली.