न्यूयॉर्क :
स्वयंपाक घरापासून ते रणभूमीपर्यंत आणि हॉस्पिटलपासून ते हॉटेलपर्यंत अनेक ठिकाणी सध्या रोबोंचा वावर आहे. माणसाला थक्क करणारी कामे हे यंत्रमानव करीत आहेत. आता दोन एकसारख्या दिसणार्या आणि कुत्र्यासारख्या चतुष्पाद अशा तिसर्या रोबोचा अफलातून नृत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एखाद्या चित्रपटातील नर्तकांनी एका लयीत सुंदर नृत्य करावे असे नृत्य या तीन रोबोंनी करून सर्वांनाच थक्क केले आहे.
'मॅट्रॉईड'चे सीईओ रझा झादेह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या तीन रोबोंच्या नृत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'तुमच्यासमवेत पार्टीमध्ये किंवा अन्य ठिकाणी रोबो नृत्य करीत असेल तर कसे वाटेल?' अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. या रोबोंचा एका लयीत होणारा पदन्यास, वेगवेगळ्या मुद्रा भल्या भल्या नर्तकांची आठवण करून देणारा आहे. झादेह यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यावर त्यावर 'टेस्ला' व 'स्पेस एक्स'चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. एखादा रोबो चालत, पायर्या चढत किंवा उतरत असेल किंवा अन्य हालचाली करीत असेल तर त्याचेही अनेकांना अप्रूप वाटत असते. अशा स्थितीत हे रोबो अतिशय चपळाईने अनेक प्रकारच्या हालचाली नृत्याच्या माध्यमातून करीत असल्याने लोक थक्क होत आहेत.