वॉशिंग्टन : अजगराने सशाची शिकार करणे ही अत्यंत सामान्य बाब आहे; पण आता ससाच अजगराची शिकार करतोय असे म्हटले तर? फ्लोरिडातील ‘एव्हरग्लेडस्’च्या जंगलात अजगरांची प्रचंड वाढलेली संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वैज्ञानिकांनी एक अत्यंत अनोखी आणि हायटेक युक्ती शोधून काढली आहे. अजगरांना जाळ्यात ओढण्यासाठी जंगलात सौरऊर्जेवर चालणारे ‘रोबोटिक ससे’ तैनात करण्यात आले आहेत.
साऊथ फ्लोरिडा वॉटर मॅनेजमेंट डिस्ट्रिक्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा यांनी संयुक्तपणे हे हायटेक जाळे विणले आहे. या रोबोटिक सशांचे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब खऱ्या सशासारखा गंध आणि शारीरिक उष्णता सोडतात, ज्यामुळे अजगर त्यांच्याकडे आकर्षित होतात. अजगर शिकार करण्यासाठी आपल्या ‘थर्मल सेन्सिंग’ (उष्णता ओळखण्याची क्षमता) आणि तीक्ष्ण वास घेण्याच्या शक्तीचा वापर करतात. संशोधकांनी अजगराच्या याच सवयीचा वापर करून सापळा रचला आहे. संशोधकांनी तैनात केलेले हे रोबोटिक ससे खऱ्या सशाप्रमाणेच उष्णता आणि वास सोडत असल्याने अजगराला ते खरे आहेत की बनावट, यातील फरक ओळखता येत नाही. या रोबोंमध्ये बसवलेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) कॅमेरा आजूबाजूला पूर्ण लक्ष ठेवतो. जसा एखादा अजगर या रोबोच्या जवळ येतो, तसा हा कॅमेरा अजगर पकडणाऱ्या विशेष पथकाला अलर्ट मेसेज पाठवतो. मेसेज मिळताच प्रशिक्षित शिकारी घटनास्थळी पोहोचून अजगराला ताब्यात घेतात.
हे रोबो सोलर-पावर्ड असल्यामुळे यांची बॅटरी वारंवार बदलावी लागत नाही आणि ते अविरत काम करत राहतात. फ्लोरिडाच्या जंगलात हे परदेशी (बर्मीज) अजगर १९७० च्या दशकात पोहोचले होते. आज त्यांची संख्या तब्बल १ ते ३ लाखांपर्यंत पोहोचली असून, ते स्थानिक वन्यजीवांसाठी मोठा धोका बनले आहेत. हे अजगर १८ फुटांपेक्षा जास्त लांब असू शकतात आणि मादी अजगर एकाच वेळी ७० पेक्षा जास्त अंडी घालू शकते.