न्यूयॉर्क : रुबिक्स क्युब हे कोडे सोडवण्याबाबतचे अनेक विक्रम आजपर्यंत झालेले आहेत. कमीत कमी वेळेपासून ते पाण्याखाली बसून, तसेच वेगवेगळ्या प्रकारे हे कोडे सोडवण्याच्या विक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र, आता एका रोबोने या सर्वांवर मात करून दाखवली आहे.
‘टोकुफास्टबोट’ नावाच्या या रोबोने केवळ 0.305 सेकंदामध्ये हे कोडे सोडवून दाखवले. ते इतक्या वेगाने झाले की, एकाच मूव्हने त्याने हे कोडे सोडवल्यासारखे वाटले! 21 मे रोजी ‘टोकुफास्टबोट’ने 3 बाय 3 बाय 3 साईजच्या रुबिक्स क्युबला वेगाने साेडवले.
अर्थातच यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’चे योगदान आहे. त्यामुळेच या रोबोला इतक्या वेगाने हे कोडे सोडवता आले. एखाद्या माणसाला पापण्यांची उघडझाप करीत असताना जितका वेळ लागतो, त्यापेक्षाही कमी वेळात या रोबोने हे कोडे सोडवून दाखवले. जपानच्या मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनने हा रोबो बनवला आहे. त्याचे नाव ‘टोकुई फास्ट अॅक्युरेट सिंक्रोर्नाईज्ड मोशन टेस्टिंग रोबो’ (टोकुफास्टबोट) असे आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती करणार्या कारखान्यांमध्ये सहायक म्हणून या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. या रोबोमध्ये एका मल्टिअॅक्सिस मोटारला जोडलेल्या सहा भुजा आहेत. तसेच एक हायस्पीड कॅमेराही आहे. हे दोन्ही एका इंडस्ट्रियल कॉम्प्युटरला जोडलेले आहेत. प्रत्येक भुजा केवळ 0.009 सेकंदामध्ये 90 अंशात वळवण्याची क्षमता या यंत्रणेत आहे.
21 मे रोजी ‘टोकुफास्टबोट’ने 3 बाय 3 बाय 3 साईजच्या रुबिक्स क्युबला वेगाने फिरवत केवळ 0.305 सेकंदामध्ये हे कोडे सोडवून दाखवले. हा एक नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यापूर्वीचा विक्रम 0.38 सेकंदाचा होता जो 2018 मध्ये एमआयटी रोबोने केला होता. जून 2023 मध्ये मॅक्स पार्क या माणसाने 3.13 सेकंदांत रुबिक्स क्युब सोडवून दाखवले होते. त्याच्यापेक्षा दहपट अधिक वेगाने या जपानी रोबोने आता रुबिक्स क्युब सोडवून दाखवले आहे.