Robot rescue elderly | गोळीबारातून वाचण्यासाठी धडपडणार्‍या आजीबाईंच्या मदतीला धावला ‘रोबो’ 
विश्वसंचार

Robot rescue elderly | गोळीबारातून वाचण्यासाठी धडपडणार्‍या आजीबाईंच्या मदतीला धावला ‘रोबो’

पुढारी वृत्तसेवा

कीव्ह : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना, रणभूमीवर एक अत्यंत भावुक करणारी घटना घडली आहे. डोनेस्तक प्रांतातील लायमन शहरात रशियन गोळीबारातून जीव वाचवून पळणाऱ्या एका ७७ वर्षीय वृद्ध आजींना एका युक्रेनी लष्करी रोबोने सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे.

युक्रेनच्या '६० व्या सेपरेट मेकॅनाईज्ड ब्रिगेड'चे सैनिक ड्रोनद्वारे परिसरावर नजर ठेवून होते. यावेळी त्यांना एक वृद्ध महिला हातात दोन काठ्या घेऊन चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून अतिशय कष्टाने चालताना दिसली. रशियन सैन्याकडून होणाऱ्या सततच्या गोळीबारामुळे आणि बॉम्बस्फोटांमुळे या आजींचे गाव उद्ध्वस्त झाले होते. त्या आपला जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षित आसरा शोधण्यासाठी मैलोन्‌मैल चालत होत्या.

'आजी, वर बसा!' : सैनिकांची अनोखी युक्‍ती

आजींना चालताना त्रास होत असल्याचे पाहून सैनिकांनी तिथे स्वतः जाणे धोकादायक असल्याने, त्यांनी एका रिमोट-नियंत्रित रोबोला पांघरूण (ब्‍लॅकेंट) देऊन तिथे पाठवले. या रोबोवर सैनिकांनी एक चिठ्ठी चिकटवली होती, ज्यावर लिहिले होते - "आजी, काळजी करू नका, यावर बसा!"

असा झाला धाडसी प्रवास

सुरुवातीला आजी थोड्या गोंधळल्या; मात्र नंतर त्यांनी रोबोचा आधार घेतला. हा रोबो त्यांना घेऊन अनेक तास प्रवास करत सुरक्षित लष्करीतळापर्यंत पोहोचला. जेव्हा आजी सुरक्षितपणे लष्करी वाहनापर्यंत पोहोचल्या, तेव्हा लाईव्ह फीड पाहणाऱ्या सैनिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘चला, आता आपण शांतपणे श्वास घेऊ शकतो... देवाचे आभार!’ असे उद्‌गार एका सैनिकाने काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT