वॉशिंग्टन : मंगळाबाबत संशोधकांना मोठेच कुतुहल वाटते व त्यासाठी तिथे स्पिरिट, अपॉच्युर्निटी आणि क्युरिऑसिटी नावाचे रोव्हरही पाठवण्यात आलेले आहेत. आता तिथे कुत्राही पाठवण्यात येणार आहे. अर्थात हा कुत्रा खरा नसून तो कुत्र्याच्या आकाराचा रोबो आहे. या रोबो डॉगला सध्या मंगळावरील गुहा शोधण्यासाठीचे 'प्रशिक्षण' दिले जात आहे.
हा रोबो चार पायांचा व एखाद्या चतुष्पाद प्राण्याची नक्कल करील असा रोबो आहे. त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये शोधकार्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे काही सेन्सिंग उपकरणेही आहेत. अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या वार्षिक बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले. 'नासा-जेपीएन कॅलटेक'ने हे 'मार्स डॉग्ज' सादर करून त्यांचे प्रयोजन स्पष्ट केले. हा रोबो सध्या मंगळभूमीवर असलेल्या चाकांच्या रोव्हरसारखेच काम करील. मात्र, या रोबोमधील अद्ययावत सेन्सर्स त्याला अडथळ्यांपासून बचाव करण्याची तसेच अनेक मार्गांमधून योग्य मार्ग निवडण्याची क्षमता देईल. तेथील जमिनीतील छुप्या गुहा व सुरुंगांचा छडाही हा रोबो श्वान लावू शकेल. मंगळावरील पारंपरिक रोव्हर्स हे बहुतांशी सपाट पृष्ठभागावर काम करू शकणारेच आहेत. त्यांच्यामधील उणीवा या रोबो श्वानामुळे दूर होतील.