मॉस्को : रशियातील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात रोबोने ग्राहकावर मार्शल आर्टसच्या शैलीत हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून या रोबोला रोखले असले, तरी या घटनेमुळे एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबाबत जगभरात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
रशियाच्या 'साराटोव्ह’ शहरातील 'व्होल्गा इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात एक ग्राहक आत शिरला. त्याने रोबोकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, परंतु रोबोने प्रतिसाद न दिल्याने ग्राहकाने त्याला गंमतीत मागे ढकलले. यानंतर अवघ्या काही सेकंदांत रोबोने या ग्राहकावर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. रोबोचा आक्रमक अवतार पाहून दुकानातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. दोन कर्मचाऱ्यांनी तत्काळ मध्यस्थी केली आणि रोबोला मागे खेचून पकडण्याचा प्रयत्न केला.
पब्लिसिटी स्टंट की तांत्रिक बिघाड?
इलेक्ट्रॉनिक्सच्या या दुकानाने हा व्हिडीओ स्वतःच जारी केल्यामुळे हा खरोखर घडलेला अपघात आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला बनाव, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनमधील एका बागेत मार्शल आर्टसचे प्रात्यक्षिक दाखवताना एका ह्युमनॉइड रोबोने फिरून मारलेल्या लाथेमुळे एका लहान मुलाच्या पोटात मार बसल्याची घटना घडली होती. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मानवनिर्मित तंत्रज्ञानाच्या धोक्यांवर चिंता व्यक्त केली आहे. ‘यंत्रे आता मानवावर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहेत’ आणि ‘बेकायदेशीर एआयच्या विकासाला आळा न घातल्यास अशा घटना आणखी वाढतील,’ अशा प्रतिक्रिया युजर्सकडून उमटत आहेत.