सेऊल : तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असणार्या दक्षिण कोरियातून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. येथील एका रोबोने बौद्ध उपदेश सोहळ्यात (धम्म दीक्षा) सहभाग घेतला असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला रोबो ठरला आहे. ‘योन्हाप’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सेऊल येथील ऐतिहासिक ‘जोग्येसा’ मंदिरात भिक्षूंच्या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात 130 सेंटीमीटर उंचीचा ‘गाबी’ नावाचा रोबो सर्वांचे आकर्षण ठरला. विशेष म्हणजे, या रोबोने भिक्षूंचा पारंपरिक पेहरावही परिधान केला होता. सोहळ्यादरम्यान त्याने इतर भिक्षू आणि भिक्षुणींसमोर आदराने झुकून अभिवादन केले आणि बौद्ध धर्माप्रती समर्पणाची प्रतिज्ञा घेतली.
जेव्हा एका भिक्षूने विचारले, ‘तू स्वतःला भगवान बुद्धांना समर्पित करशील का?’, तेव्हा रोबोने स्पष्ट आवाजात ‘हो, मी स्वतःला समर्पित करेन,’ असे उत्तर दिले. या रोबोचे नाव ‘सिद्धार्थ’ आणि कोरियन भाषेतील ‘करुणा’ (दया) या शब्दांपासून तयार करण्यात आले आहे. त्याचे नाव उच्चारण्यास सोपे असावे आणि तो बुद्धांच्या करुणेचा संदेश जगभर पोहोचवणारा प्रतीक ठरावा, या हेतूने ‘गाबी’ हे नाव निश्चित करण्यात आले. नामकरणानंतर एका ज्येष्ठ भिक्षूने गाबीच्या गळ्यात 108 मण्यांची माळ घातली.
तसेच, त्याच्या हातावर एक स्टिकर लावून पारंपरिक ‘योनबी’ प्रथा पूर्ण केली. (या प्रथेमध्ये नवीन भिक्षूंच्या त्वचेवर अगरबत्तीने हलका डाग दिला जातो. मात्र, रोबोसाठी येथे स्टिकरचा वापर करण्यात आला). चीनच्या ‘युनिट्री रोबोटिक्स’ या कंपनीने हा रोबो विकसित केला आहे. या रोबोसाठी खास पाच नियम तयार करण्यात आले आहेत : 1. जीवांचा आदर करा आणि कोणालाही हानी पोहोचवू नका. 2. इतर रोबो किंवा वस्तूंना नुकसान करू नका. 3. मानवांच्या आज्ञांचे पालन करा आणि उलट उत्तर देऊ नका. 4. फसवणूक किंवा चुकीच्या वर्तनापासून दूर राहा. 5. ऊर्जेची बचत करा आणि ‘ओव्हरचार्जिंग’ टाळा.