बीजिंग : तंत्रज्ञानाच्या जगात रविवारी एक नवा इतिहास रचला गेला. बीजिंगमध्ये पार पडलेल्या ई-टाऊन ह्युमनॉईड रोबो हाफ मॅरेथॉनमध्ये मानवी कौशल्यांना यंत्रांनी चकित केले. या शर्यतीत चीनच्या हॉनर कंपनीने विकसित केलेल्या ‘लायटनिंग’ नावाच्या ह्युमनॉईड रोबोने 21.1 किलोमीटरचे अंतर अवघ्या 50 मिनिटे आणि 26 सेकंदांत पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘लायटनिंग’चा हा वेग मानवी विक्रमाला सुरुंग लावणारा ठरला. युगांडाच्या जेकब किप्लिमोने नोंदवलेल्या 57:20 मिनिटांच्या मानवी जागतिक विक्रमापेक्षा ‘लायटनिंग’ने तब्बल 7 मिनिटांनी कमी वेगळ घेत शर्यत पूर्ण केली.
या शर्यतीत पहिल्या तिन्ही क्रमांकांवर हॉनर कंपनीच्या रोबोनी ताबा मिळवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या रोबोनी अनुक्रमे 51 आणि 53 मिनिटांत शर्यत पूर्ण केली. या रोबोमध्ये स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे प्रगत लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, जेणेकरून धावताना निर्माण होणाऱ्या उष्णतेवर नियंत्रण मिळवता येईल. विशेष म्हणजे, यंदा सुमारे 40 टक्के रोबो हे कोणत्याही रिमोट कंट्रोलशिवाय, स्वतःच्या सेन्सर्स आणि एआयच्या मदतीने स्वायत्तपणे धावत होते.
गेल्या वर्षी याच स्पर्धेत विजेत्या रोबोला 2 तास 40 मिनिटे लागली होती. मात्र, केवळ एका वर्षात रोबोच्या वेगात झालेली ही सुधारणा थक्क करणारी आहे. लायटनिंग रोबोचे पाय 90 ते 95 सें.मी. लांब बनवण्यात आले आहेत, जेणेकरून तो मानवी धावपटूंसारखीच हालचाल करू शकेल. ओम्डियाच्या अहवालानुसार, ह्युमनॉईड रोबोच्या विक्रीत चीन सध्या जगात आघाडीवर आहे. युनिट्री रोबोटिक्स आणि यूबीटीच रोबोटिक्स यांसारख्या कंपन्या दरवर्षी हजारो रोबोची विक्री करत आहेत.
ह्युमनॉईड रोबो सक्षम आणि टिकाऊ
मानवी शारीरिक मर्यादांना आता यंत्रांच्या वेगाने मागे टाकले आहे, ज्यामुळे भविष्यातील उद्योग आणि तंत्रज्ञानात रोबोचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही बीजिंगमधील शर्यत केवळ मनोरंजनासाठी नसून, ह्युमनॉईड रोबो आता कारखाने आणि कठीण कामांसाठी किती सक्षम आणि टिकाऊ झाले आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. इलॉन मस्क यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरताना दिसत आहे की, ह्युमनॉईड रोबोटिक्सच्या क्षेत्रात चीन हा जगातील सर्वात मोठा स्पर्धक म्हणून समोर येत आहे.