Robot Sexual Harassment | रोबोकडून षोडशवर्षीय तरुणीचा लैंगिक छळ!  
विश्वसंचार

Robot Sexual Harassment | रोबोकडून षोडशवर्षीय तरुणीचा लैंगिक छळ!

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन : जर्मनीत एका रोबोने तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा अत्यंत विचित्र प्रकार समोर आला असून ही जगातील अशी पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्यानंतर पोलिस प्रशासनाला जाग आलीये. एका ह्युमनॉईड रोबोने सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सारा प्रकार जर्मनीच्या कोलोन शहरात घडला असून सध्या त्याची जगभर चर्चा आहे.

ही घटना होहेनझोलर्नरिंग परिसरात, फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर रात्री उशिरा घडल्याचं सांगण्यात येत आहे. मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत उभी असताना सुमारे १.२ मीटर उंचीचा लाल-सोनेरी रंगाचा रोबो मागून आला. त्याने मुलीच्या पार्श्वभागाला (नितंबांना) स्पर्श केला आणि आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. मुलगी जोरात ओरडली आणि बाजूला सरकली. रोबोचा सोळा वर्षीय मालक आणि त्याच्या १९ वर्षीय साथीदाराने हा सारा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर (टीकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर) लाईव्ह स्ट्रीम केला. पोलिसांनी तक्रार मिळताच रोबो जप्त केला. तो एका फॉक्सवॅगन कारच्या डिकीत लपवून ठेवण्यात आल्याचं आढळलं. संशयितांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी तपास सुरू केला असून, रोबोची हालचाल रिमोटने नियंत्रित केली जात होती की प्रोग्राम केलेली होते, याचा शोध घेतला जातोय. दोन्ही तरुणांवर अजून आरोप ठरवण्यात आलेले नाही, पण संशयित म्हणून त्यांची चौकशी केली जात आहे. या रोबोला कपडे घालण्यात आले होते. हिरव्या रंगाचं जॅकेट घातलेल्या या रोबोच्या गळ्यात सोन्याची साखळी, डोळ्यावर सनग्लासेस आणि चेहऱ्यावर खोटी मिशी लावलेली होती. आयर्नमॅनप्रमाणे त्याचा लूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून जर्मन पोलिसांनी, अशा प्रकारे रोबोने एखाद्या व्यक्तीचा लैंगिक छळ करण्याची घटना आमच्यासाठीही नवीन असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये कायदेशीर बाबतीत आम्ही सल्ले घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अर्थात, या प्रकारामागे रोबो नसून त्याचे उपद् व्यापी मालक आहेत हे उघडच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT