बीजिंग : चीनमधील शिनजियांग प्रांतात असलेल्या ताकलामाकन वाळवंटाच्या मध्यभागी एक महाकाय ‘ध’ आकाराची आकृती उपग्रहाद्वारे टिपण्यात आली आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण आकार नैसर्गिक डोंगराची रांग आणि मौल्यवान रत्नांनी समृद्ध असलेल्या नदीच्या संगमातून तयार झाला असून, येथे आठव्या शतकातील एक ऐतिहासिक किल्लादेखील स्थित आहे.
1,30,000 चौरस मैल क्षेत्रफळात पसरलेले ताकलामाकन वाळवंट हे एकेकाळी अत्यंत उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे ‘जैविक शून्य’ मानले जात असे. मात्र, 1974 पासून राबवण्यात आलेल्या ‘ग्रेट ग्रीन वॉल’ या वृक्षारोपण प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट झाला असून, आता हे वाळवंट मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे केंद्र बनले आहे. नासाच्या ‘अर्थ ऑब्झर्व्हेटरी’नुसार, हा आकार प्रामुख्याने दोन नैसर्गिक घटकांमुळे तयार झाला आहे : होतान नदी : ही नदी दक्षिण-उत्तर अशी सुमारे 180 मैल पसरलेली आहे. कुनलुन पर्वतावरील हिमनद्या वितळल्यामुळे या नदीला पाणी मिळते.
नदीच्या पात्रात पांढर्या आणि हिरव्या रंगाचे ‘नेफ्राईट’ नावाचे मौल्यवान खडे (जेड) मोठ्या प्रमाणात आढळतात. नदीकाठी असलेल्या वनस्पतींमुळे अवकाशातून ही नदी हिरव्या रंगाची दिसते. मारझाटाघ रांग : ही सुमारे 90 मैल लांब आणि 600 फूट उंच डोंगराची रांग आहे. ही रांग ‘ध’ अक्षराची दुसरी बाजू तयार करते. मारझाटाघ डोंगररांगेत लाल रंगाचे लोहयुक्त खडक आणि फिकट रंगाचे वाळूचे खडक यांचे थर आहेत. यामुळे याला चिनी भाषेत ‘होंगबाईशान’ म्हणजेच ‘लाल-पांढरा डोंगर’ असे म्हटले जाते. हा डोंगर वार्यासोबत उडणार्या वाळूसाठी नैसर्गिक भिंतीसारखे काम करतो.
यामुळे या डोंगराच्या उत्तरेकडील कडेला चंद्राच्या कोरीप्रमाणे दिसणारे वाळूचे ढिगारे तयार झाले आहेत, जे अवकाशातून एखाद्या समुद्राच्या लाटांसारखे भासतात. केवळ भौगोलिक रचनाच नव्हे, तर हे ठिकाण ऐतिहासिकद़ृष्ट्याही महत्त्वाचे आहे. येथे आठव्या शतकातील एक प्राचीन किल्ला आहे, जो रेशीम मार्गावरील संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला जात असे. चीनच्या वृक्षारोपण मोहिमेमुळे (66 अब्जाहून अधिक झाडे) या वाळवंटातील पर्यावरणात होत असलेले बदल शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहेत.