Dinosaur Extinction impact | डायनासोरच्या विनाशानंतर नद्यांमध्ये झाले मोठे बदल Pudhari File Photo
विश्वसंचार

Dinosaur Extinction impact | डायनासोरच्या विनाशानंतर नद्यांमध्ये झाले मोठे बदल

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : मिशिगन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, जेव्हा डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले, तेव्हा आपल्या ग्रहावर, विशेषतः नद्यांमध्ये, मोठे बदल झाले. या संशोधनाचे निष्कर्ष ‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायरमेंट’मध्ये प्रकाशित झाले आहेत.

या संशोधनात, अमेरिकेच्या पश्चिम भागातील शास्त्रज्ञांनी शोध लावला की, डायनासोरच्या विनाशानंतर तिथे घनदाट जंगलं वाढली. या जंगलांमुळे नद्यांमधील माती वाहून जाण्यापासून थांबली आणि नद्या अधिक रुंद आणि नागमोडी (वळणावळणाच्या) बनल्या. वैज्ञानिकांनी दीर्घकाळापासून डायनासोरच्या विनाशापूर्वी आणि नंतरच्या खडकांमध्ये फरक असल्याचे पाहिले आहे. याआधी, या फरकाचे कारण निर्जीव गोष्टी (उदा. हवामान, भूगर्भीय क्रिया) मानले जात होते. मात्र, जीवाश्मशास्त्रज्ञ ल्यूक वीवर यांनी आपल्या ताज्या संशोधनात सांगितले की, डायनासोरच्या विनाशानंतर वाढलेल्या घनदाट जंगलांनी नद्यांच्या प्रवाहावर आणि मातीच्या संचयावर मोठा परिणाम केला.

वैज्ञानिकांच्या टीमने ‘फोर्ट युनियन फॉर्मेशन’ नावाच्या एका विशिष्ट खडकाची तपासणी केली. सुरुवातीला त्यांना वाटले की, यात तलावातील माती साठली आहे; पण नंतर असे आढळून आले की, ती मोठ्या नागमोडी नद्यांची माती होती. जेव्हा डायनासोर अस्तित्वात होते, तेव्हा वनस्पती कमी होत्या, त्यामुळे नद्यांचे पाणी पूर मैदानात पसरत असे; पण डायनासोरच्या विनाशानंतर घनदाट जंगलं वाढली आणि झाडांनी नद्यांच्या किनार्‍यांना मजबूत केले, ज्यामुळे पूर कमी झाले. तसेच, जमिनीवर एक विशिष्ट प्रकारचा काळा थर जमा होऊ लागला.

हत्तींसारख्या मोठ्या प्राण्यांना पाहून वीवर यांना ही कल्पना सुचली. कारण, हे प्राणी त्यांच्या सभोवतालचे वातावरण बदलून टाकतात. वीवर यांनी विचार केला की, डायनासोरदेखील खूप मोठे होते, त्यामुळे त्यांचा वनस्पती आणि जमिनीवर नक्कीच मोठा परिणाम झाला असेल. त्यांनी त्यांच्या शोधांना आणि जुन्या संशोधनांना एकत्र करून हे सिद्ध केले की, डायनासोर हे ‘इकोसिस्टम इंजिनिअर्स’ म्हणून काम करत होते. याचा अर्थ असा की, ते थेटपणे पृथ्वीच्या रचनेत बदल घडवून आणत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT