मॉस्को : आर्क्टिक प्रदेशात वाढणाऱ्या तापमानामुळे सैबेरियामध्ये अनियंत्रित मिथेन वायूच्या उत्सर्जनाला चालना देणाऱ्या दोन वेगवेगळ्या हवामान प्रणाली निर्माण होत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ६ ऑगस्ट रोजी ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, उत्तर अटलांटिक महासागरातून येणाऱ्या उष्णता आणि आर्द्रतेमुळे पश्चिम सैबेरिया अधिक दमट (दलदलीचा) बनत आहे. याउलट, पूर्व सैबेरिया कोरडा होत असून, तेथील जंगलांमध्ये वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. मध्य रशियातील येनिसे नदी या खोऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितींना विभाजित करते, असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, २०१० ते २०२३ दरम्यान सैबेरियातील मिथेनचे उत्सर्जन प्रतिवर्ष ५ टक्क्यांनी वाढले आहे. यात पश्चिम सैबेरियामध्ये वितळणाऱ्या मातीतील सूक्ष्मजीव घटकांमुळे, तर पूर्व सैबेरियामध्ये जंगलांतील वनस्पती जळण्यामुळे (वणव्यांमुळे) हा घातक हरितगृह वायू मोठ्या प्रमाणावर हवेत फेकला जात आहे. ‘परमाफ्रॉस्ट (कायमस्वरूपी गोठलेली जमीन) वितळणे, पाणथळ जागांची वाढती सक्रियता आणि जंगलातील वणव्यांचे वाढते प्रमाण पाहता मिथेन उत्सर्जनातील ही वाढ अपेक्षितच होती,’ असे या अभ्यासाचे सहलेखक आणि एडिनबर्ग विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ जिओसायन्सेस’चे प्राध्यापक पॉल पामर यांनी स्पष्ट केले. ‘परंतु, ही वाढ इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सतत होत राहणे खरोखरच धक्कादायक आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
अभ्यास कालावधीत वार्षिक मिथेन उत्सर्जनामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख टन (१ कोटी २० लाख मेट्रिक टन) वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील पाणथळ जमिनींमधून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाच्या वाढीव दराशी जवळीक साधणारी आहे. सध्या जागतिक मिथेन उत्सर्जनामध्ये सायबेरियाचा वाटा फक्त ५ टक्के असला, तरी हा प्रदेश पृथ्वीवरील नैसर्गिक मिथेन वायूच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्रोतांपैकी एक बनत चालला आहे, असा इशारा पॉल पामर यांनी दिला आहे.