Brain Stroke Risk | तरुणांमध्ये वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका 
विश्वसंचार

Brain Stroke Risk | तरुणांमध्ये वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका

ताण, धूम्रपान, लठ्ठपणा आणि अपूर्ण झोप ठरताहेत कारणीभूत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ताणतणाव, धूम्रपान, लठ्ठपणा आणि अपूर्ण झोप यासारख्या कारणांमुळे तरुण वयातच लोक ब्रेन स्ट्रोकचे शिकार होत आहेत. तरुणांची बिघडलेली जीवनशैली आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. खराब सवयींमुळे काहीजणांना अगदी २५ व्या वर्षीही ब्रेन स्ट्रोक झाल्याचे समोर आले आहे.

चुकीची खानपान शैली आणि निकृष्ट फिटनेसमुळे लठ्ठपणा वाढतो. यामुळे मधुमेह, कोलेस्‍टेरॉल आणि उच्च रक्तदाबाचा (हायपरटेन्शन) आजार बळावतो. अशा रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका तिप्पट असतो. न्यूरोसर्जन म्हणतात की, मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यामुळे रक्ताचा प्रवाह खंडित होतो, ज्याला ‘इस्केमिक स्ट्रोक’ म्हणतात. रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव झाल्यास त्याला ‘हेमरेजिक स्ट्रोक’ म्हणतात. ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. या दोन्ही परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांकडे पोहोचल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

ही आहेत स्ट्रोकची लक्षणे : शरीराचा एक बाजूकडील भाग कमजोर किंवा सुन्‍न होणे, अचानक तीव्र वेदना होणे. चेहऱ्याचा भाग वाकडा होणे, हसताना चेहऱ्याचा एक भाग खाली झुकणे. बोलताना उच्चार चुकणे, बोलण्यात किंवा ऐकण्यात अडचण निर्माण होणे. अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा अंधुक दिसणे, दिसणे बंद होणे. अचानक चक्कर आल्यामुळे शरीराचा तोल बिघडणे आणि खाली पडणे. या गोष्टींची काळजी घ्या : धूम्रपान, तंबाखू आणि फास्टफूडचे सेवन टाळा. मधुमेहाची आणि रक्तदाबाची (बीपी) नियमित तपासणी करा. दररोज ६ ते ८ तासांची गाढ आणि आरोग्यदायी झोप घ्या. रोज ४५ मिनिटे वेगाने चालणे किंवा सायकल चालवणे यासारखे व्यायाम करा. वजन वाढू देऊ नका आणि नियमित व्यायाम करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT