विनाश?... ‘डूम्सडे क्लॉक’ आता मध्यरात्रीपासून केवळ 85 सेकंद दूर! File photo
विश्वसंचार

विनाश?... ‘डूम्सडे क्लॉक’ आता मध्यरात्रीपासून केवळ 85 सेकंद दूर!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : रशिया, चीन आणि अमेरिका यांसारख्या महासत्तांमधील वाढता संघर्ष, अण्वस्त्रांचा धोका आणि हवामान बदलामुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. ‘बुलेटिन ऑफ द अ‍ॅटॉमिक सायंटिस्टस्’ या विज्ञान-देयवादी गटाने मंगळवारी ही धोक्याची घंटा वाजवत प्रसिद्ध ‘डूम्सडे क्लॉक’ आता मध्यरात्रीपासून केवळ 85 सेकंदांवर नेऊन ठेवले आहे.

मानवाच्या अस्तित्वासाठी असलेल्या धोक्यांचे मोजमाप करणार्‍या या घड्याळात गेल्या वर्षी मध्यरात्रीपर्यंत 89 सेकंद उरले होते. मात्र, आता हे अंतर अवघ्या 85 सेकंदांवर आले आहे. ‘मध्यरात्र’ हा काळ मानवाचा पूर्ण विनाश दर्शवतो. 1947 मध्ये जेव्हा हे घड्याळ सुरू झाले, तेव्हा ते मध्यरात्रीपासून 7 मिनिटे दूर होते. शीतयुद्धाच्या शेवटी हे अंतर 17 मिनिटांपर्यंत वाढले होते; परंतु आता ते इतिहासातील सर्वात कमी अंतरावर आले आहे.

धोक्याची मुख्य कारणे :

1. अण्वस्त्रांचा वाढता धोका : रशिया-युक्रेन युद्ध आणि इराणच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दलची शंका यामुळे जग आण्विक युद्धाच्या छायेत आहे.

2. हवामान बदल: जगभरातील उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ आणि जागतिक नेत्यांचे हवामान बदलाकडे होणारे दुर्लक्ष ही चिंतेची बाब आहे.

3. तंत्रज्ञानाचा गैरवापर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) अनियंत्रित वापर आणि जैव-तंत्रज्ञानाचा संभाव्य गैरवापर हे देखील मानवतेसाठी मोठे धोके मानले जात आहेत.

4. सहकार्याचा अभाव : देशांमधील वाढती स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय करारांचे कोलमडणे यामुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. संस्थेच्या ‘सायन्स अँड सिक्युरिटी बोर्ड’चे अध्यक्ष डॅनियल होल्झ म्हणाले की, ‘जर जग ‘आम्ही विरुद्ध ते’ अशा दोन गटात विभागले गेले, तर सर्वांच्याच विनाशाची शक्यता वाढेल.’ या अहवालात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाश्म इंधनांना दिलेल्या प्रोत्साहनावर आणि अक्षय ऊर्जा उत्पादनातील अडथळ्यांवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. ‘जर जागतिक नेत्यांनी एकत्र येऊन या अस्तित्वाच्या धोक्यांवर उपाययोजना केल्या, तर या घड्याळाचे काटे पुन्हा मागे फिरवता येतील,’ असेही या गटाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT