लंडन : वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची वाढती पातळी अॅमेझॉनच्या जंगलातील झाडांच्या असामान्य वाढीस कारणीभूत ठरत आहे, एका प्रमुख नवीन अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. ‘नेचर प्लँटस्’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे आढळून आले आहे की, गेल्या 30 वर्षांपासून अॅमेझॉनमधील झाडांच्या सरासरी आकारात दर दशकात 3.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शासस्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, वातावरणात कार्बन डायऑक्साईडची उच्च एकाग्रता वनस्पतींच्या वाढीस चालना देते, ज्याला ‘फर्टिलायझिंग इफेक्ट’ म्हणतात. अॅमेझॉनमध्ये झाडांचा आकार वाढण्याचा हा कल या प्रभावाशी सुसंगत आहे. या निष्कर्षांसाठी ठअखछऋजठ नेटवर्कने काम केले. हे दक्षिण अमेरिका, यूके आणि इतर ठिकाणच्या 60 हून अधिक विद्यापीठांची आंतरराष्ट्रीय भागीदारी आहे. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीडस् विद्यापीठांचाही यात समावेश आहे.
जवळजवळ 100 शास्त्रज्ञांनी 188 स्थायी वन भूखंडांमधील झाडांचे निरीक्षण केले आणि हा दीर्घकालीन डेटासेट तयार केला. ब्राझीलमधील युनिव्हर्सिडेड दो माटो ग्रोसो येथील प्रोफेसर बीट्रिझ मॅरिमन यांनी दक्षिण अॅमेझोनियामधील डेटा संकलनाचे समन्वय साधले. त्या म्हणाल्या, ‘ही एक चांगली बातमी आहे. हवामान बदल आणि जंगलतोड अॅमेझॉनच्या जंगलांना कसा धोका निर्माण करत आहे, हे आपण नियमितपणे ऐकतो; पण या दरम्यान, ज्या जंगलांना धक्का लागलेला नाही, त्यातील झाडे अधिक मोठी झाली आहेत; या धोक्यांचा सामना करूनही सर्वात मोठी झाडे भरभराटीला येत आहेत.’