न्यूयॉर्क : पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे, जिथे गरीब माणूस औषधालादेखील सापडणार नाही. या ठिकाणी तीन लाख कोट्यधीश आणि 60 अब्जाधीश राहतात. हे ठिकाण म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. जगातील टॉप 50 श्रीमंत शहरांपैकी 11 शहरे अमेरिकेत आहेत. जाणून घेऊया पृथ्वीवरील या सर्वात श्रीमंत शहराविषयी.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेचे वर्चस्व पाहायला मिळते. जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींपैकी नऊ जण अमेरिकेतील आहेत. याच अमेरिकेत जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. हेन्ली अँड पार्टनर्सच्या 2024 च्या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे अव्वल स्थानी आहे. 3,49,500 करोडपती, तसेच 675 व्यक्ती ज्यांची किमान संपत्ती 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे, याच शहराचे रहिवासी आहेत. तसेच इथे 60 अब्जाधीश राहतात. यामुळेच न्यूयॉर्क हे जगातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे. सन 2023 मध्ये न्यूयॉर्क शहराची अर्थव्यवस्था सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्स इतकी होती. अमेरिकन शेअर बाजार वॉल स्ट्रीट न्यूयॉर्कमध्येच आहे. यामुळेच न्यूयॉर्कला अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते.
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि नॅसडॅक हे जगातील सर्वात मोठे स्टॉक मार्केट आहेत. सिक्युरिटीज उद्योगात 1,81,000 पेक्षाही अधिक लोक रोजगार करतात आणि अब्जावधी डॉलर्सचा कर भरतात. जगातील अनेक आघाडीच्या वित्तीय कंपन्यांची मुख्यालये देखील न्यूयॉर्क शहरात आहेत. जेपी मॉर्गन चेस, सिटीग्रुप, मॉर्गन स्टॅनली आणि गोल्डमन सॅक्स यांचा समावेश आहे. न्यूयॉर्क शहर हे मीडिया, तंत्रज्ञान, फॅशन, आरोग्यसेवा आणि रिअल इस्टेटमध्ये देखील जागतिक आघाडीवर आहे. न्यूयॉर्कमध्ये तंत्रज्ञान उद्योग वेगाने वाढत आहे. गुगल, अॅमेझॉन आणि फेसबुक सारख्या बड्या टेक कंपन्या न्यूयॉर्क शहरात त्यांचा व्यवसाय वाढवत आहेत. फॅशन उद्योगात सुमारे 1,80,000 लोक काम करतात. द न्यूयॉर्क टाईम्स, एनबीसी आणि कोंडे नास्ट सारख्या प्रमुख मीडिया हाऊसेसदेखील येथून काम करतात. न्यूयॉर्क शहराची लोकसंख्या सुमारे 82 लाख इतकी आहे. येथे 800 भाषा बोलणारे लोक राहतात. न्यूयॉर्कमध्ये घरांच्या किमतीदेखील खूपच महागड्या आहेत.