Hollywood News | रिचर्ड गेरे आणि सिंडी क्रॉफर्ड यांच्या मुलांचा हॉलीवूडमध्ये एकत्र धमाका 
विश्वसंचार

Kaia Gerber & Homer Gere | रिचर्ड गेरे आणि सिंडी क्रॉफर्ड यांच्या मुलांचा हॉलीवूडमध्ये एकत्र धमाका

पुढारी वृत्तसेवा

लॉसएंजलिस : हॉलीवूडचे एकेकाळचे प्रसिद्ध जोडपे रिचर्ड गेरे आणि सुपरमॉडेल सिंडी क्रॉफर्ड यांचा घटस्फोट होऊन ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता या दोघांच्या पुढील पिढीतील मुलांनी एकत्र काम करून हॉलीवूडच्या या जुन्या नात्याला एक नवे रंजक वळण दिले आहे. रिचर्ड गेरे यांचा मुलगा होमर गेरे आणि सिंडी क्रॉफर्ड यांची मुलगी काया गर्बर ‘एफएक्स’च्या आगामी ‘द शार्ड्स’ या वेब सीरिजमध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

नुकत्याच न्यूयॉर्क शहरात पार पडलेल्या प्रीमियरदरम्यान या दोघांनी रेड कार्पेटवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २६ वर्षीय होमर गेरे (रिचर्ड गेरे आणि त्यांची दुसरी पत्नी कॅरी लोवेल यांचा मुलगा) याने सांगितले की, शूटिंग सुरू होण्यापूर्वी ते एकमेकांना ओळखत नव्हते. शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी संपूर्ण कास्टसोबत एका बारमध्ये त्यांची पहिली भेट झाली आणि तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली. पालकांच्या भूतकाळातील नात्याबद्दल विचारले असता, २४ वर्षीय काया गर्बरने हसत ‘‘कसले नाते?’’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. तिने पुढे सांगितले की, ‘‘होमर खूप विनोदी आहे, तो मला खूप हसवतो आणि तो एक अप्रतिम सहकलाकार आहे.’’

‘युफोरिया’नंतर होमर गेरेचा हा दुसरा मोठा अभिनय प्रकल्प आहे. होमरने सांगितले की, तो आजही सेटवर असताना आपल्या वडिलांचा (रिचर्ड गेरे) सल्ला घेतो. सीन कसा करावा यापेक्षा सेटवर स्वतःला कसे सांभाळावे आणि करिअरमध्ये उत्तम काम कसे करावे, याविषयी तो दररोज वडिलांशी चर्चा करतो. रिचर्ड गेरे आणि सिंडी क्रॉफर्ड यांचा विवाह १९९१ मध्ये झाला होता आणि १९९५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तीन दशकांनंतर त्यांच्या मुलांचे हे व्यावसायिक एकत्र येणे सध्या हॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT