नवी दिल्ली : वैज्ञानिकांनी ऊर्जा साठवणुकीच्या (एनर्जी स्टोअरेज ) क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे. आपल्या शरीरातील अन्न ऊर्जेत रूपांतरित करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतून प्रेरणा घेऊन संशोधकांनी ग्लुकोज (साखर) आणि व्हिटॅमिन बी 2 (रायबोफ्लेविन) यावर चालणारी एक नवीन बॅटरी डिझाईन केली आहे. स्वस्त आणि कार्यक्षम पर्याय तसेच पर्यावरणपूरकता यावर या शोधात वैज्ञानिकांनी भर दिला आहे.
बॅटरी बनवताना महागड्या आणि दुर्मीळ धातूंऐवजी रायबोफ्लेविनचा (व्हिटॅमिन बी 2) वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे बॅटरीचा खर्च कमी झाला असून ती अधिक पर्यावरणास अनुकूल (इको फे्ंरडली) झाली आहे. या बॅटरीमध्ये कार्बन इलेक्ट्रोडस् वापरले आहेत. एका बाजूला ग्लुकोज आणि व्हिटॅमिन बी 2 असते, तर दुसर्या बाजूला पोटॅशियम फेरिसायनाईड किंवा ऑक्सिजन वापरले जाते. या रचनेमुळे पूर्वीच्या ग्लुकोज बॅटरींपेक्षा 20 पट जास्त ऊर्जा (पॉवर) मिळाली. या बॅटरीची क्षमता व्यावसायिक व्हॅनेडियम फ्लो बॅटरीइतकीच आहे; पण उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी आहे.
ही बॅटरी कोणत्याही विषारी (टॉक्सिक) किंवा दुर्मीळ धातूंपासून नव्हे, तर सुरक्षित आणि सहज उपलब्ध असलेल्या सामान्य घटकांपासून तयार केली आहे. या डिझाईनमुळे नूतनीकरणक्षम ऊर्जा (रिनेव्हेबल एनर्जी) साठवणूक, जसे की सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा, घरगुती वापरासाठी आणि व्यवसायांसाठी अधिक परवडणारी (अफॉरटेबल) आणि टिकाऊ (सस्टेनेबल) होऊ शकेल. हे तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात एक अनोखे पाऊल आहे, जे निसर्गाच्या विरोधात न जाता त्याच्यासोबत म्हणजेच पर्यावरणपूरक काम करते.