Astronomy new discovery | खगोल शास्त्रज्ञांना आढळली ‘उलटी’ सूर्यमाला 
विश्वसंचार

Astronomy new discovery | खगोल शास्त्रज्ञांना आढळली ‘उलटी’ सूर्यमाला

पुढारी वृत्तसेवा

लंडन : खगोलशास्त्रज्ञांनी एका अत्यंत असामान्य ग्रहमालेचा शोध लावला आहे, जिथे नियमांच्या विरुद्ध एक खडकाळ ग्रह त्याच्या तार्‍यापासून खूप दूर अंतरावर फिरत आहे. सामान्यतः ग्रहांच्या निर्मितीच्या सिद्धांतानुसार, खडकाळ ग्रह तार्‍याच्या जवळ असतात आणि वायुरूप ग्रह दूर असतात. परंतु, या नवीन शोधामुळे शास्त्रज्ञांना जुन्या सिद्धांतांचा फेरविचार करावा लागत आहे.

‘सायन्स’ या नियतकालिकात 12 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, ही ग्रहमाला आपल्या सूर्यमालेपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि ‘इनसाईड-आऊट’ म्हणजेच उलट्या रचनेची आहे. आपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे खडकाळ ग्रह सूर्याच्या जवळ आहेत, तर गुरू आणि शनीसारखे वायुरूप महाकाय ग्रह दूर आहेत. या नवीन शोधलेल्या प्रणालीमध्ये चार ग्रह आहेत. त्यातील पहिले तीन ग्रह सामान्य नियमांचे पालन करतात; परंतु चौथा आणि सर्वात बाहेरचा ग्रह हा ‘खडकाळ’ आहे. तो दोन महाकाय वायुरूप ग्रहांच्याही पलीकडे स्थित आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकचे शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक थॉमस विल्सन म्हणाले, ‘हे एक अतिशय विचित्र प्रकरण आहे. सामान्यतः खडकाळ ग्रह त्यांच्या मूळ तार्‍यापासून इतक्या लांब, वायुरूप ग्रहांच्या बाहेरच्या बाजूला तयार होत नाहीत. युरोपियन स्पेस एजन्सीच्या संशोधक इसाबेल रेबोलीडो यांच्या मते, आतापर्यंतचे आमचे ग्रह निर्मितीचे सिद्धांत हे आपल्या सूर्यमालेवर आधारित होते. मात्र, जसजशा नवीन ग्रहमाला समोर येत आहेत, तसतसे आम्हाला हे सिद्धांत बदलावे लागणार आहेत.

हा शोध लावताना आधी संशोधकांनी ‘LHS 1903’ या लाल खुजा तार्‍याचे निरीक्षण केले. 2019 ते 2023 दरम्यान ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ (TESS) आणि ‘कॅरेक्टरायझिंग एक्सोप्लॅनेट सॅटेलाईट’ (CHEOPS) या उपग्रहांच्या मदतीने या ग्रहांचा अभ्यास करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या मते, हे चारही ग्रह एकाच वेळी तयार झाले नाहीत. ते एकामागून एक तयार झाले असावेत, ज्यामुळे प्रत्येक नवीन ग्रहासाठी तिथले वातावरण बदलत गेले. हा शोध खगोलशास्त्रातील मूलभूत समजांना आव्हान देणारा ठरला असून, विश्वात ग्रहांची निर्मिती कशी होते याबद्दल नवीन माहिती देणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT