Unique Restaurant | केवळ हावभावांतून ऑर्डर घेणारे रेस्टॉरंट 
विश्वसंचार

Unique Restaurant | केवळ हावभावांतून ऑर्डर घेणारे रेस्टॉरंट

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : आजच्या धावपळीच्या आयुष्यात जेव्हा लोक एकमेकांशी नीट संवाद साधायलाही वेळ काढू शकत नाहीत, तेव्हा चीनमधील एका जोडप्याने शब्दांविनाच लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्यांचे रेस्टॉरंट कोणत्याही सर्वसामान्य हॉटेलसारखे नाही; कारण येथे जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला तोंड उघडण्याची गरजच पडत नाही. केवळ हाताचे इशारे, मेन्यूकडे बोट दाखवणे आणि चेहऱ्यावरील एक गोड स्मितहास्य इतकेच पुरेसे ठरते. या रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना एक शब्दही बोलण्याची गरज लागत नाही. येथे सर्व संवाद हावभाव, साईन लँग्वेज (सांकेतिक भाषा) आणि गोड हसण्याद्वारे साधला जातो.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, हे खास रेस्टॉरंट चीनच्या शांक्सी प्रांतातील ताइयुआन शहरात आहे. याचे नाव ‘चाओशान डेफ सिस्टर’ असे असून ते आपल्या चविष्ट ‘स्टीम्ड राईस रोल्स’साठी ओळखले जाते. हे रेस्टॉरंट यिन यिंग आणि त्यांचे पती फेंग याबिन मिळून चालवतात. दोघांनाही ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही; मात्र त्यांनी आपल्या या मर्यादेला कधीही कमकुवतपणा बनू दिले नाही. त्यांनी असे वातावरण तयार केले आहे, की संवाद साधताना कोणालाही कोणतीही अडचण येत नाही.

ग्राहक भिंतीवर लावलेल्या चिनी सांकेतिक भाषेच्या तक्त्याची मदत घेतात किंवा थेट मेन्यूवरील आपल्या आवडत्या पदार्थाकडे बोट दाखवून ऑर्डर देतात. या जोडप्याची उदारता केवळ चांगले अन्न वाढण्यापुरतीच मर्यादित नाही. या वृत्तात असेही नमूद करण्यात आले आहे की, यिन आणि फेंग यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये अशा अन्य लोकांनाही रोजगार दिला आहे, ज्यांना ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांना सुरक्षित आणि आधार देणाऱ्या वातावरणात काम करण्याची संधी मिळत आहे. याशिवाय, जे लोक पैसे देण्यास सक्षम नाहीत, अशा गरजूंना हे जोडपे अगदी मोफत जेवण देते.

यामध्ये ऐकू न येणारे विद्यार्थी आणि शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचा समावेश आहे. या रेस्टॉरंटची चर्चा जगभरात तेव्हा सुरू झाली, जेव्हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तेथे जेवायला पोहोचला. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, त्या इन्फ्लुएंसरने जोडप्याला सांगितले की त्याच्याकडे जेवणासाठी पैसे नाहीत. हे ऐकताच जोडप्याने कोणताही संकोच न करता त्याला केवळ पोटभर मोफत जेवणच दिले नाही, तर काऊंटरमध्ये ठेवलेले काही पैसेही काढून मदतीसाठी दिले. या जोडप्याची अशी निःस्वार्थ भावना पाहून इन्फ्लुएंसर भावूक झाला. त्याने पुढे त्यांची ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि भेट म्हणून या जोडप्याचे एक सुंदर स्केचही काढून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT