वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांना विलीन होणार्या कृष्णविवरांच्या दोन जोड्या सापडल्या आहेत. या प्रत्येक विलीनीकरणातील मोठे कृष्णविवर हे मागील टकरीतून तयार झालेले दुर्मीळ ‘दुसर्या पिढीचे‘ अनुभवी कृष्णविवर असल्याचा त्यांचा अंदाज आहे. या संशोधनामुळे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेला सिद्धांत पुन्हा एकदा खरा ठरला आहे.
या दोन मोठ्या कृष्णविवरांचे असामान्य वर्तन, जे अवकाशातील गुरुत्वीय लहरी म्हणून ओळखल्या जाणार्या लाटांच्या माध्यमातून पाहिले गेले, त्याचे वर्णन ऑक्टोबर 28 रोजी ‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये करण्यात आले आहे. या शोधातील महत्त्वाची गोष्ट दुहेरी आहे. प्रत्येक विलीनीकरणात मोठे कृष्णविवर वेगाने फिरत होते. ते ज्या लहान कृष्णविवराला गिळंकृत करत होते, त्यापेक्षा ते लक्षणीयरीत्या अधिक वस्तुमानाचे होते.
हे निरीक्षण LIGO- Virgo- KAGRA Collaboration या जगभरातील गुरुत्वीय लहरशोधक (gravitational wave detectors) यंत्रणांच्या संचाने केले, ज्याचा उद्देश कृष्णविवर विलीनीकरण आणि न्यूट्रॉन तारा टक्कर यांसारख्या अवकाशाला हादरवणार्या घटनांचे निरीक्षण करणे आहे. स्टीफन फेअरहर्स्ट, कार्डिफ युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर आणि LIGO सायंटिफिक कोलॅबोरेशनचे प्रवक्ते यांनी एका निवेदनात म्हटले की, या निष्कर्षांमुळे या कृष्णविवरांची निर्मिती मागील कृष्णविवर विलीनीकरणातून झाली असावी, याला आश्वासक पुरावा मिळतो.
हे संशोधन केवळ एका महिन्याच्या अंतराने शोधलेल्या दोन विलीनीकरणांवर आधारित आहे. या घटनांमधून आलेल्या गुरुत्वीय लहरींच्या सिग्नेचर्सचे (खुणांचे) विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी संबंधित कृष्णविवरांचे वस्तुमान, फिरण्याची गती आणि अंतर याचा अंदाज लावला. प्रत्येक विलीनीकरणातील मोठे कृष्णविवर हे लहान कृष्णविवराच्या जवळजवळ दुप्पट आकाराचे होते. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील खगोल-भौतिकशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या सहलेखक जेस मॅकआयव्हर यांनी निवेदनात म्हटले आहे की, हा आमच्या आजवरच्या सर्वात रोमांचक शोधांपैकी एक आहे.
हे प्रसंग यास भक्कम पुरावा देतात की, विश्वात खूप दाट आणि ‘व्यस्त’ असे भाग आहेत जे काही मृत तार्यांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत.‘ शक्य असलेल्या दुसर्या पिढीच्या कृष्णविवरांच्या शोधाव्यतिरिक्त शास्त्रज्ञांनी सांगितले की, या दोन विलीनीकरणांमुळे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एका शतकापूर्वी वर्तवलेले भौतिकशास्त्राचे नियम पुन्हा एकदा वैध ठरले आहेत. त्याचबरोबर या घटना मूलभूत कणांबद्दल (elementary particles) अधिक माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांना मदत करत आहेत. या शोधातून शास्त्रज्ञांना विश्वातील अत्यंत प्रचंड वस्तूंच्या निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.