संशोधकांनी विकसित केली स्वतः शिकणारी एआय प्रणाली Pudhari File Photo
विश्वसंचार

Self-Learning AI System | संशोधकांनी विकसित केली स्वतः शिकणारी एआय प्रणाली

अरुण पाटील

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (MIT) शास्त्रज्ञांनी एक अशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली विकसित केली आहे, जी कोणत्याही रोबोला सेन्सर्स किंवा पूर्व-प्रशिक्षणाशिवाय नियंत्रित करायला स्वतःच शिकू शकते. यामुळे आता रोबोंना माणसांप्रमाणे स्वतःच्या शारीरिक हालचालींची जाणीव होणार आहे, ज्याला एक प्रकारचे ‘आत्मभान’ (physical self - awareness) म्हटले जाऊ शकते.

ही प्रणाली कॅमेर्‍यांचा वापर करून रोबोच्या रचनेबद्दल डेटा गोळा करते, अगदी त्याचप्रमाणे जसे माणसे स्वतःच्या हालचाली पाहून शिकतात. यामुळे एआय कंट्रोलरला कोणत्याही रोबोटला चालवण्यासाठी एक स्वयं-शिक्षण मॉडेल विकसित करता येते.

या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि MIT CSAIL मधील पीएच.डी.चे विद्यार्थी, सिझे लेस्टर ली (Sizhe Lester Li) यांनी एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले, ‘तुम्ही तुमच्या बोटांवर नियंत्रण ठेवायला कसे शिकता याचा विचार करा : तुम्ही ती हलवता, निरीक्षण करता आणि जुळवून घेता. आमची प्रणाली नेमके हेच करते. ती वेगवेगळ्या हालचाली करून पाहते आणि कोणत्या नियंत्रणामुळे रोबोटचा कोणता भाग हलतो, हे स्वतःच शोधून काढते.’

पारंपरिक रोबोटिक्समधील आव्हाने

सध्याच्या रोबोटिक्समधील उपाय हे अचूक अभियांत्रिकीवर अवलंबून असतात, ज्यात विशिष्ट तपशिलांनुसार मशिन तयार केल्या जातात आणि त्यांना पूर्व-प्रशिक्षित प्रणालींद्वारे नियंत्रित केले जाते. यासाठी महागडे सेन्सर्स आणि हजारो तास प्रशिक्षण देऊन तयार केलेले एआय मॉडेल्स लागतात, जेणेकरून प्रत्येक संभाव्य हालचालीचा अंदाज लावता येईल. उदाहरणार्थ, मानवी हाताप्रमाणे वस्तू अचूकपणे पकडणे हे मशिन अभियांत्रिकी आणि एआय प्रणाली नियंत्रण या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक मोठे आव्हान राहिले आहे. या नव्या संशोधनामुळे ही पारंपरिक पद्धत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात अधिक हुशार, स्वयंपूर्ण आणि कमी खर्चात तयार होणार्‍या रोबोचा मार्ग मोकळा झाला आहे.

AI प्रणाली कशी कार्य करते?

या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन ‘कंट्रोल पॅराडाईम’ (control paradigm) तयार केला आहे. ही पद्धत कॅमेर्‍यांद्वारे रोबोटच्या हालचालींच्या व्हिडीओ प्रवाहाचा वापर करून एक ‘व्हिज्युओमोटर जेकोबियन फील्ड’ (visuomotor Jacobian field) तयार करते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, रोबोटच्या दिसणार्‍या थ्रीडी भागांना त्याच्या हालचाल करणार्‍या भागांशी (actuators) जोडले जाते. यानंतर, AI मॉडेल अचूक मोटर हालचालींचा अंदाज लावू शकते. या तंत्रज्ञानामुळे सॉफ्ट रोबोटिक्स (soft robotics) किंवा लवचिक साहित्यापासून बनवलेल्या अपारंपरिक रोबोटस्नाही फक्त काही तासांच्या प्रशिक्षणात स्वायत्त (autonomous) बनवणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT