लंडन : संशोधकांनी 'जिवंत' रोबो तयार करण्यात यश मिळवले आहे. हे रोबो स्वतःच आपले भाग बदलू शकतात आणि त्यांची स्मरणशक्तीही तीक्ष्ण आहे. हे रोबो 'झेनोबोटस्' बायोलॉजिकल रोबोंची सुधारित आवृत्ती आहे. अशा रोबोंचे गेल्या वर्षीच अनावरण करण्यात आले होते. आता टुफ्ट्स युनिव्हर्सिटी व वेर्मोंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बेडकांच्या पेशींचा वापर करून हे नवे रोबो विकसित केले आहेत.
'सायन्स' या नियतकालिकात अशा रोबोंची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा छोटासा रोबो एकाच वेळी अनेक कामे करू शकतो. तो स्वतःच इकडे-तिकडे फिरू शकतो आणि आजुबाजूची छोटी कामे स्वतः करू शकतो. शिवाय आपल्या सहकारी रोबोच्या साथीने एकत्रितपणेही काम करू शकतो. या नव्या रोबोमध्ये अनेक नव्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. तो अनेक एकट्या पेशींना एकत्र आणून आपले शरीर बनवू शकतो तसेच स्वतःची डागडुजीही स्वतःच करू शकतो. तो पाण्यात पोहूही शकतो. त्याच्याबाबतच्या अनेक गोष्टी तो लक्षात ठेवू शकतो. जुन्या रोबोंच्या तुलनेत तो अधिक वेगवान आणि सक्षम आहे. त्याचे आयुर्मानही अधिक आहे. पर्यावरण आणि आरोग्य व्यवस्थेत असे रोबो चांगल्याप्रकारे काम करू शकतात.