सॅन फ्रान्सिस्को : मानवी गर्भावस्थेमध्ये गर्भाशय आणि वार कशा प्रकारे विकसित होतात आणि भ्रूणाचे पोषण करण्यासाठी त्यामध्ये कोणते बदल होतात, याचा एक सविस्तर ‘अॅटलास’ (नकाशा) शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. या संशोधनादरम्यान वैज्ञानिकांना अशा एका पेशीचा शोध लागला आहे, जिची नोंद यापूर्वी कधीही करण्यात आली नव्हती. ही पेशी केवळ गर्भावस्थेतच दिसून येते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को (UCSF) मधील तज्ज्ञांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात 8 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या विशिष्ट प्रकारच्या अज्ञात पेशी सामान्यतः गर्भाशयात नसतात. मात्र, गर्भधारणा होताच जेव्हा गर्भाशयाचे अस्तर भ्रूणाला आधार देण्यासाठी बदलू लागते, तेव्हा या पेशींची संख्या झपाट्याने वाढते. या पेशी गर्भाशयाला मातेच्या रक्तपुरवठ्याशी जोडण्याचे काम करतात. विशेष म्हणजे, या पेशींमध्ये ‘कॅनॅबिनॉईडस्’ला प्रतिसाद देणारे रिसेप्टर्स असतात.
शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारे घटक किंवा गांजासारख्या पदार्थांमधील रसायने यांना या पेशी प्रतिसाद देतात. गर्भावस्थेत गांजाचे सेवन केल्यास प्लॅसेंटाचा रक्तपुरवठा कमी होणे, बाळाला ऑक्सिजन कमी मिळणे, मुदतपूर्व जन्म किंवा जन्मतः बाळाचे वजन कमी भरणे यांसारखे धोके का निर्माण होतात, याचे उत्तर या पेशींच्या माध्यमातून मिळू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वीच्या संशोधनांमध्ये गर्भावस्थेतील ठरावीक टप्प्यांचाच अभ्यास केला गेला होता. मात्र, या नवीन संशोधनात शास्त्रज्ञांनी गर्भावस्थेच्या 5 व्या आठवड्यापासून ते 39 व्या आठवड्यापर्यंतच्या (जन्मापर्यंतच्या) काळातील उतींचा अभ्यास केला आहे.
UCSF आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ‘टिश्यू बँक’मध्ये जतन केलेल्या नमुन्यांचा वापर करून शास्त्रज्ञांनी सुमारे 12 लाख पेशींचे विश्लेषण केले. यामध्ये पेशींमधील जनुकीय हालचाली, प्रथिनांची उपस्थिती आणि ‘डीएनए’च्या रचनेचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. हे संशोधन गर्भावस्थेतील गुंतागूंत समजून घेण्यासाठी आणि भविष्यात सुरक्षित प्रसूतीसाठी नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे.