जकार्ता : इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात प्राचीन पिरॅमिडचे अवशेष सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पश्चिम जावामध्ये हे अवशेष सापडले असून, ते हजारो वर्षांपूर्वीचे असल्याचे म्हटले जात आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, एखाद्या टेकडीसारखा दिसणारा हा भाग म्हणजे वास्तवात एक जुना पिरॅमिड आहे. तो इजिप्तमधील गिझाच्या पिरॅमिड व इंग्लंडमधील स्टोनहेंजपेक्षाही अधिक जुना असू शकतो. या शोधामुळे मानवी संस्कृतीच्या विकासाबाबतची नवी माहिती मिळू शकते. आगामी काळात या ठिकाणाबाबत अधिक संशोधन होऊन नवी नवी माहिती समोर येऊ शकते.
इंडोनेशियात पश्चिम जावाच्या डोंगराळ भागात हा पिरॅमिड आढळला. या रहस्यमय रचनेला अनेक तज्ज्ञ जगातील सर्वात जुना पिरॅमिड मानत आहेत. जर हा दावा खरा ठरला, तर वास्तुकलेचा इतिहास आणखी मागे जाऊ शकतो. कार्बन डेटिंगवरून असे दिसते की, त्याची निर्मिती तब्बल 27 हजार वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी शेवटचे हिमयुग सुरू झाले होते. हा पिरॅमिड त्या काळात अनेक टप्प्यांमध्ये बनवण्यात आला. या जागेचे सध्या वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन सुरू असून, त्यामधून एका विशाल संरचनेचे पुरावे समोर येत आहेत. प्राचीन काळातील अभियंत्यांच्या कौशल्याची ही एक साक्ष आहे. आधुनिक कृषीशास्त्र किंवा ज्ञात संस्कृतींच्या अस्तित्वात येण्यापूर्वी या संरचनेची निर्मिती झाली होती. प्रागैतिहासिक काळातील मानवाची तंत्रज्ञानात्मक क्षमता आणि सामाजिक जीवन याबाबत या शोधाने एक नवा प्रकाश पडू शकतो. गुनुंग पडंगचे स्थानिक लोकांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. ते या ठिकाणाला ‘पुंडेन बेरुंडक’ म्हणजेच शिडीदार पिरॅमिडच म्हणतात. त्याच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी त्याच्या छताच्या भागाला एका खास डिझाईनने तयार केले आहे. हा पिरॅमिड कालौघात माती आणि झाडा-झुडपांनी झाकून गेला होता. त्यामुळे इतकी वर्षे त्याकडे संशोधकांचे लक्ष गेले नव्हते. अलीकडेच इंडोनेशियन वैज्ञानिकांच्या एका टीमला आढळले की, गुनुंग पडंग हा सामान्य नैसर्गिक डोंगर नसून, तो प्राचीन काळात बनवण्यात आलेला एखादा पिरॅमिड असू शकतो. तेथील भूकंपाच्या लहरींच्या अभ्यासावरून असे दिसले आहे की यामध्ये अनेक धुपी भुयारे व खोल्या असू शकतात. त्यापैकी काही 15 मीटरपर्यंतच्या लांबीची व दहा मीटर उंचीची असू शकतात. एका लुप्त ज्वालामुखीच्या ठोस लाव्हा प्रवाहाचा उपयोग करून हा पिरॅमिड बांधला असावा.