वॉशिंग्टन : 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरला मंगळभूमीवरून गोळा केलेल्या खडकांच्या दहा वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये जीवसृष्टीला आधारभूत ठरणार्या विविध जैविक रेणूंचा संग्रह असल्याचे दिसून आले. हे नमुने मंगळावरील एका विवरातून म्हणजेच विशाल खड्ड्यातून गोळा केलेले आहेत. मात्र, या रेणूंचा स्रोत अद्यापही अज्ञातच आहे.
या खडकांच्या नमुन्यांमध्ये जैविक संयुगे आहेत. त्यामध्ये कार्बन आणि अन्य काही मूलद्रव्यांचे रेणू आहेत. त्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फरचा समावेश आहे. यापूर्वी पृथ्वीवर आलेल्या मंगळावरील काही उल्कांमध्येही संशोधकांना विविध प्रकारच्या जैविक रेणूंचा छडा लागला होता. तसेच 'नासा'च्या क्युरिऑसिटी रोव्हरलाही मंगळावरील गेल क्रेटरमध्येही असेच घटक आढळून आले होते. हे रोव्हर तिथे 2012 पासून संशोधन करीत आहे. अमेरिकेच्या पॅसाडेनामधील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील भारतीय वंशाच्या संशोधिका सुनंदा शर्मा यांनी सांगितले की हे अॅस्ट्रोबायोलॉजिस्टसाठी उत्कंठावर्धक असे संकेत आहेत. हे रेणू म्हणजे जीवसृष्टीसाठीचे 'बिल्डिंग ब्लॉक्स' किंवा पायाभूत सामग्री आहेत.
अर्थात ते काही प्रक्रियांमधूनही निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जीवसृष्टीचे अस्तित्वाच हवे असे नसते. त्यामुळे हे रेणू तिथे आहेत याचा अर्थ मंगळावर जीवसृष्टी आहे असा होत नाही!