विश्वसंचार

दुसर्‍या महायुद्धातील बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष

Arun Patil

वॉशिंग्टन : दुसर्‍या महायुद्धातील बॉम्बपासून बुडालेल्या पाणबुड्यांपर्यंत अनेक गोष्टींचे अवशेष अजूनही सापडत असतात. आता या युद्धातील एका विमानाचे अवशेष समुद्रतळाशी सापडले आहेत.

अमेरिकन एअरमन वॉरेन सिंगर 25 ऑगस्ट 1943 रोजी फॉगियाजवळील इटालियन एअरफिल्डवर झालेल्या हल्ल्यावेळी बेपत्ता झाले होते. त्यावेळी ते पी-38 लायटनिंग फायटर प्लेनमध्ये होते. ते कधीही त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले नाहीत. यूएस एअरफोर्सच्या रेकॉर्डनुसार त्यांचे शेवटचे ठिकाण फोगियापासून 22 मैल दूर होते. विमानासह अचानक बेपत्ता झाल्याने सर्वांनी त्यांना मृत मानले. सखोल चौकशीनंतर 26 ऑगस्ट 1944 रोजी वॉरेन सिंगर यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत काय घडले हे रहस्य आता 80 वर्षांनंतर उलगडले आहे. ते ज्या विमानात होते ते आता समुद्रतळाशी सापडले आहे.

पाणबुड्यांना मॅन्फ्रेडोनियाच्या खाडीत 40 फूट खोल पाण्यात या विमानाचे अवशेष सापडले आहेत. विमानाच्या अवशेषांची ओळख पटवणारे डायव्हर डॉ. फॅबियो बिस्किओटी यांनी सांगितले की समुद्रतळाशी असलेले हे अवशेष अद्यापही सुस्थितीत आहेत. तांत्रिक समस्येमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघातापूर्वी वॉरेन सिंगर यांनी विमानातून उडी मारली; पण पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा. या विमानाच्या अवशेषात 50 कॅलिबर बुलेट आणि एक इंजिन क्रँककेसदेखील सापडला आहे. अपघातावेळी वॉरेन केवळ 22 वर्षांचे होते व पाचच महिन्यांआधी त्यांचा विवाह झाला होता.

SCROLL FOR NEXT