Japan monkey story Pudhari
विश्वसंचार

Japan monkey story: आईने नाकारलं, पण खेळण्याने सावरलं!

जपानच्या ‌‘पंच‌’ माकडाची हृदयस्पर्शी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : जपानमधील इचिकावा सिटी झू मध्ये राहणारा एक छोटा जपानी मकाक सध्या आपल्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कथेमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‌‘पंच‌’ असे या चिमुकल्या माकडाचे नाव असून, त्याच्या एका व्हिडीओने लाखो नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये जन्मलेल्या पंचला त्याच्या जन्मदात्या आईने स्वीकारण्यास नकार दिला होता. आईचे प्रेम न मिळाल्याने हतबल झालेल्या पंचला आधार देण्यासाठी प्राणिसंग््राहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओरंगउटानसारखे दिसणारे एक ‌‘सॉफ्ट टॉय‌’ (मऊ खेळणे) दिले. पंच या खेळण्याला आपल्या छातीशी घट्ट धरून फिरायचा. या खेळण्याला ‌‘ओरा-ममा‌’ असे नाव देण्यात आले. महिनोन्‌‍महिने पंच या खेळण्यापासून क्षणभरही दूर झाला नाही; तो त्याच्याशी खेळायचा आणि त्याला बिलगूनच झोपायचा. या खेळण्यामुळे त्याला सुरक्षेची जाणीव झाली. सोशल मीडियावर #KeepGoingPunch सारखे हॅशटैग ट्रेंड होऊ लागले आणि लोक त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवू लागले.

सुरुवातीला इतर माकडांच्या कळपात मिसळणे पंचसाठी कठीण होते; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. झू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पंच आता हळूहळू इतर माकडांमध्ये मिसळू लागला आहे. नुकतेच एका मोठ्या माकडाने त्याला ‌‘ग््रूामिंग‌’ (केस साफ करणे) करताना पाहिले गेले. माकडांच्या जगात ग््रूामिंग करणे हे केवळ स्वच्छतेचे लक्षण नसून ते एकमेकांवरील विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते. केअरटेकर शुम्पेई मियाकोशी यांच्या मते, पंच आता मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. तो इतर लहान माकडांच्या पाठीवर बसून खेळताना दिसतो. कधी मोठ्या माकडांकडून ओरडा खाल्ला तरी तो आता घाबरत नाही, तर लगेच सावरतो. हे त्याच्या सामाजिक प्रगतीचे उत्तम लक्षण आहे.

पंचच्या या भावुक प्रवासाने प्रभावित होऊन अनेकांनी त्याला ‌‘बहादूर‌’ म्हटले आहे. विशेष म्हणजे, IKEA Japan ने या प्राणिसंग््राहालयाला अनेक सॉफ्ट टॉयज दान केले आहेत. यापूर्वी 2024 मध्ये मेलबर्नचा ‌‘पेस्टो‌’ (पेंग्विन) आणि थायलंडची ‌‘मू डेंग‌’ (हिप्पोपोटॅमस) सोशल मीडियावर गाजले होते; पण पंचची गोष्ट वेगळी आहे. आईपासून दुरावल्यानंतर एका निर्जीव खेळण्याकडून मिळालेला आधार आणि त्यानंतर स्वतःच्या कुटुंबात मिळालेली स्वीकृती, हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT