Dementia prevention diet | अंड्याच्या नियमित सेवनाने टळू शकतो डिमेंशियाचा धोका 
विश्वसंचार

Dementia prevention diet | अंड्याच्या नियमित सेवनाने टळू शकतो डिमेंशियाचा धोका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वाढत्या वयानुसार विसरभोळेपणा होणे ही सामान्य बाब मानली जाते; परंतु डिमेंशियामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि वर्तणुकीत होणारी घसरण सामान्य नसते. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ‘अल्जाइमर’ हा आजार, जो मेंदूची कार्यक्षमता कमकुवत करतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या आजारावर अद्याप कोणताही ठोस उपचार उपलब्ध नाही. मात्र, अमेरिकेतील संशोधकांनी अंडी आणि अल्जाइमर यांच्यात एक सकारात्मक संबंध शोधून काढला आहे, जो या आजारापासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अंड्यांच्या सेवनाने हा धोका दूर ठेवता येऊ शकतो, असे आढळले आहे.

‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन’ वर प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतात 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील सुमारे 88 लाख वृद्ध डिमेंशियाने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, डिमेंशियाच्या एकूण प्रकरणांपैकी 60 ते 80 टक्के प्रकरणांमागे अल्जाइमर हेच मुख्य कारण असते. अमेरिकेतील संशोधकांनी आहारातील घटक आणि अल्जाइमरचा धोका यांचा अभ्यास केला. ‘सायन्स डायरेक्ट’वर प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात असे दिसून आले की, मेंदूच्या आरोग्यासाठी अंडी हा एक उत्तम स्रोत आहे.

अंड्यांमध्ये असे पोषक घटक असतात जे मेंदूला संरक्षण देतात. संशोधनानुसार, जे लोक अंडी अजिबात खात नाहीत किंवा खूप कमी खातात, त्यांच्यामध्ये अल्जाइमरचा धोका सर्वाधिक असतो. त्यांच्या तुलनेत जे लोक आठवड्यातून एकदा किंवा 2 ते 4 वेळा अंडी खातात, त्यांच्यात हा धोका कमी असतो. सर्वात कमी धोका अशा लोकांमध्ये दिसून आला, जे आठवड्यातून 5 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अंडी खातात. तथापि, संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, हा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा अंडी संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT