Dinosaur Fossils Brazil | ब्राझीलमधील डायनासोरच्या जीवाश्ममध्ये आढळल्या लाल रक्तपेशी  
विश्वसंचार

Dinosaur Fossils Brazil | ब्राझीलमधील डायनासोरच्या जीवाश्ममध्ये आढळल्या लाल रक्तपेशी

११५ कोटी वर्षे जुन्या अवशेषांमधून महत्त्वपूर्ण शोध

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सुमारे ११५ कोटी वर्षांपूर्वी (क्रिटेशियस कालावधीत) ब्राझीलमध्ये वावरणाऱ्या एका मध्यम आकाराच्या मांसाहारी डायनासोरच्या जीवाश्मात संशोधकांना लाल रक्तपेशींचे (रेड ब्‍लड सेल्‍स) भक्कम पुरावे सापडले आहेत. ब्राझीलमधील ‘अराटासॉरस म्युसेयुनासिओनाली’ या थेरपॉड डायनासोरच्या उजव्या पायाच्या हाडाच्‍या जीवाश्‍मात (फॉसिलॉईड्‌झ) संशोधकांना अतिसूक्ष्म स्वरूपात लाल रक्तपेशी आढळून आल्या आहेत. ‘प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस’ या प्रतिष्ठित नियतकालिकात हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

संशोधकांना केवळ सूक्ष्म रचनाच नव्हे, तर ‘हीम’ नावाच्या लोहयुक्त जैव-रेणूचे रासायनिक पुरावेही मिळाले आहेत, जो रक्ताला लाल रंग देणाऱ्या हिमोग्लोबिनचा महत्त्वाचा भाग असतो. या संशोधनामुळे डायनासोरचे रक्ताचे नमुने सापडले असले, तरी यात कोणताही जिवंत किंवा सुरक्षित डीएनए (DNA) सापडलेला नाही, असे मुख्य संशोधक क्लिमा ग्राईस यांनी स्पष्ट केले आहे. हा केवळ प्राचीन जैविक घटकांचा एक रासायनिक आणि खनिजांचा पुरावा आहे. हा डायनासोर जेव्हा मृत पावला, तेव्हा तो अंदाजे ४ वर्षांचा असावा. त्याची लांबी सुमारे १० फूट (३.१ मीटर) होती. त्याचे अवशेष ब्राझीलमधील जिप्सम खणीतून शोधून काढण्यात आले होते. मऊ पेशी आणि रक्तपेशी लाखो वर्षे टिकून राहणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते. या नव्या शोधामुळे प्रागैतिहासिक जीवसृष्टीच्या आणि रेणवीय जतनाबाबतच्या (मोलिक्‍युलर प्रिझर्वेशन) अनेक जुन्या समजुती बदलण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT