नवी दिल्ली : उत्तर प्रशांत महासागराच्या (नॉर्थ पॅसिफिक ओशन) पाण्याने या वर्षीचा सर्वात उष्ण उन्हाळा अनुभवला आहे. हवामान शास्त्रज्ञांना गोंधळात टाकणार्या या गूढ सागरी उष्णतेच्या लाटेमुळे (मरिन हिटवेव्ह) हा विक्रम नोंदवला गेला आहे.
विक्रमी तापमान वाढ
युरोपीय कॉपरनिकस हवामान सेवेच्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2022 च्या मागील उच्चांकापेक्षा 0.25 पेक्षा जास्त होते. भूमध्य समुद्राच्या दहा पट मोठ्या असलेल्या या क्षेत्रासाठी ही वाढ खूप मोठी आहे. बर्कले अर्थ येथील हवामान शास्त्रज्ञ झेक हॉसफादर यांच्या मते, इतक्या मोठ्या प्रदेशात इतकी मोठी तापमानवाढ होणे खरोखरच गंभीर आहे. जागतिक तापमानवाढ सागरी उष्णतेच्या लाटांना अधिक शक्यता निर्माण करत असली तरी, उत्तर प्रशांत महासागर इतका जास्त काळ उष्ण का आहे, हे स्पष्ट करणे शास्त्रज्ञांना कठीण जात आहे.
तापमानवाढीची संभाव्य कारणेहवामान मॉडेलच्या अंदाजानुसार, उत्तर प्रशांत महासागरामध्ये ऑगस्टमध्ये इतके तापमान वाढण्याची शक्यता 1 टक्क्यापेक्षाही कमी होती. त्यामुळे नैसर्गिक बदलांव्यतिरिक्त इतर काही घटक यासाठी कारणीभूत मानले जात आहेत. त्यामध्ये कमी वाहणारे वारे, शिपिंग इंधनातील बदल, चीनमधील प्रदूषण नियंत्रण यांचा समावेश आहे. या उन्हाळ्यात वारे नेहमीपेक्षा कमकुवत होते. त्यामुळे सूर्याची उष्णता पाण्याच्या पृष्ठभागावरच राहिली, ती थंड पाण्यामध्ये मिसळली गेली नाही. 2020 पूर्वी जहाजांमध्ये वापरल्या जाणार्या इंधनातून सल्फर डायऑक्साईड बाहेर पडत असे.
या वायूमुळे वातावरणात एरोसोल नावाचे कण तयार होत, जे सूर्याची उष्णता परावर्तित करून तापमान नियंत्रणात ठेवत असत. आरोग्यासाठी हानिकारक असलेले सल्फर कमी केल्यामुळे, हा थंडपणा देणारा प्रभाव निघून गेला आहे. डॉ. हॉसफादर यांच्या मते, या तापमानवाढीसाठी सल्फर हे प्राथमिक कारण असू शकते. चीनमधील शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे प्रशांत महासागराचे तापमान वाढले असावे, असे काही संशोधकांचे मत आहे. जागतिक हवामानावर संभाव्य परिणामप्रशांत महासागरातील या उष्णतेच्या लाटेचा परिणाम केवळ जपान आणि दक्षिण कोरियातील अतिउष्ण उन्हाळ्यावरच नव्हे, तर दूरच्या युरोप आणि यूकेच्या हवामानावरही होऊ शकतो.
यूके/युरोपमध्ये थंडीची शक्यता वर्तवली आहे. लीडस् विद्यापीठातील प्राध्यापक अमांडा मेयकॉक यांच्या मते, या उष्णतेमुळे वातावरणामध्ये लहरी गती (वेव्ह मोशन) निर्माण होऊ शकतात. यामुळे युरोप आणि उत्तर अटलांटिकमध्ये उच्च दाबाची स्थिती (हाय प्रेशर कंडिशन) निर्माण होते. अशा स्थितीमुळे आर्क्टिक प्रदेशातील थंड हवा युरोपकडे खेचली जाऊ शकते, ज्यामुळे हिवाळ्याची सुरुवात अधिक थंडीने होण्याची शक्यता आहे.