वॉशिंग्टन : पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 2024 मध्ये विक्रमी पातळीवर वाढले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) एका नवीन अहवालात हे सांगण्यात आले आहे आणि यामुळे पृथ्वीचे तापमान दीर्घकाळासाठी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अहवालात CO2 वाढण्यासाठी मानवी गतिविधींद्वारे होणारे सततचे उत्सर्जन, जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ, तसेच जमिनीवरील परिसंस्था आणि महासागरांकडून होणारे CO2 चे शोषण कमी होणे याला जबाबदार धरले आहे.
WMO च्या अहवालानुसार, 1960 च्या दशकापासून CO2 च्या वाढीचा दर दरवर्षी 0.8 पीपीएम (पार्टस् पर मिलियन) च्या तुलनेत तिप्पट वाढला आहे. 2011-20 च्या दशकात हा दर दरवर्षी 2.4 पीपीएम झाला होता, तर 2023 ते 2024 मध्ये CO2 ची जागतिक सरासरी एकाग््राता 3.5 पीपीएम मोजली गेली, जी 1957 मध्ये आधुनिक मापन सुरू झाल्यापासूनची सर्वात मोठी वाढ आहे. दरम्यान, मानवी गतिविधींशी संबंधित इतर दोन महत्त्वपूर्ण ग््राीनहाऊस वायू, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडदेखील विक्रमी पातळीवर वाढले आहेत. WMO चे उपमहासचिव को बॅरेट म्हणाले, ‘कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीनहाऊस वायूंद्वारे शोषली जाणारी उष्णता आपल्या हवामानाला गरम करत आहे, ज्यामुळे सतत उष्णता वाढत आहे.’ त्यांनी उत्सर्जनात कपात करणे हवामानासोबतच मानवांसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले.
ग्रीनहाऊस बुलेटिन पहिल्यांदा 2004 मध्ये जारी करण्यात आले होते. त्यावेळी WMO च्या निरीक्षण केंद्रातून मोजलेली कार्बन डायऑक्साईडची वार्षिक पातळी 377.1 पीपीएम होती. 2024 मध्ये ती 423.9 झाली आहे. दरवर्षी जेवढ्या प्रमाणात CO2 चे उत्सर्जन होते, त्यापैकी अर्धा भाग वातावरणात राहतो आणि उर्वरित पृथ्वीच्या स्थलीय परिसंस्था आणि महासागरांद्वारे शोषला जातो. परंतु, जसजसे जागतिक तापमान वाढते, तसतसे महासागर उच्च तापमानामुळे विरघळण्याची क्षमता कमी झाल्याने कमी CO2 शोषून घेतात.
2023 आणि 2024 दरम्यान विक्रमी वाढ होण्याचे संभाव्य कारण जमीन आणि महासागरांकडून झालेले कमी CO2 शोषण होते, जे रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष आहे. WMO नुसार, अल निनो दरम्यान देखील CO2 ची पातळी वाढते. या काळात झाडे-वनस्पती सुकणे आणि जंगलातील आगीमुळे जमिनीची CO2 शोषून घेण्याची क्षमता कमी होते. WMO च्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी ओक्साना तारासेवा यांनी स्थलीय आणि महासागरीय CO2 शोषकांची (CO2 सिंक) कार्यक्षमता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामुळे वातावरणातील CO2 चे प्रमाण वाढेल, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला वेग येईल, असे त्यांनी सांगितले.