समस्तीपूर : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिद्दीननगर तालुक्यात निसर्गाचे एक दुर्मीळ आणि थक्क करणारे दृश्य पाहायला मिळाले. जोरदार वारा आणि पावसादरम्यान पाण्याच्या पृष्ठभागावरून आकाशाच्या दिशेने फिरणारा हवेचा एक प्रचंड खांब उठताना दिसला. काही वेळातच या असामान्य दृश्याने स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य टिपले असून, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, हा फक्त सोशल मीडियावर व्हायरल झालेला एखादा सर्वसाधारण व्हिडीओ नाही. ‘डॉ. राजेंद्र प्रसाद हवामान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांच्या मते, समस्तीपूरच्या मोहिद्दीननगर भागात दिसलेली ही घटना ‘वॉटर स्पाऊट’ (Water Spout) असू शकते. हवामान शास्त्रानुसार, अनुकूल वातावरणात पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या हवेच्या चक्राकार स्तंभाला ‘वॉटर स्पाऊट’ म्हटले जाते. व्हायरल व्हिडीओमध्ये तुंबलेल्या पाण्यावर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर एक अरुंद आणि वेगाने फिरणारा स्तंभ दिसत आहे, जो आकाशाच्या दिशेने वर जाताना जाणवतो. लांबून पाहिल्यास त्याचा आकार एखाद्या मोठ्या नळकांड्यासारखा किंवा हत्तीच्या सोंडेसारखा दिसत आहे. पाणी आणि आकाश यांच्या दरम्यान फिरणारी ही आकृती काही काळ स्पष्टपणे दिसत असल्याने स्थानिकांसाठी हे अत्यंत कौतुकाचे आणि आश्चर्याचे ठरले.
व्हिडीओमध्ये वादळी वाऱ्याचा प्रचंड वेग स्पष्टपणे दिसून येत आहे. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे आसपासच्या घरांवरील सिमेंटचे आणि पत्र्याचे शेड उडून गेल्याचे दिसत आहे, यावरून त्या वेळी वाऱ्याचा वेग किती भयंकर होता याचा अंदाज येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, वॉटर स्पाऊटमध्ये हवा अत्यंत वेगाने चक्राकार फिरते. पाण्याच्या पृष्ठभागावरून उठणारे पाण्याचे तुषार आणि वातावरणातील दमटपणा एकत्र येऊन असा दृश्यमान खांब तयार होतो. हा देखावा पाहून पाण्याचा अख्खा प्रवाह थेट ढगांपर्यंत पोहोचत असल्याचा भास होतो; परंतु प्रत्यक्षात ही आकृती बाष्पीभवन झालेल्या पाण्याचे थेंब आणि हवेतील ओलाव्यामुळे बनते.