Two-Headed Turtle | दोन तोंडे आणि एकच कवच असलेले अद्‌भुत‌ कासव 
विश्वसंचार

Two-Headed Turtle | दोन तोंडे आणि एकच कवच असलेले अद्‌भुत‌ कासव

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या इंटरनेटवर एका अशा कासवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, त्‍याला पाहून लोक थक्क झाले आहेत. या अनोख्या कासवाला एक नाही तर चक्क दोन तोंडे आणि चार डोळे आहेत. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या कासवाची दोन्ही तोंडे पूर्णपणे सक्रिय आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये प्राणिसंग्रहालय (झू) चालवणारे जे ब्रुअर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जे ब्रुअर हे सोशल मीडियावर प्राणी आणि सरपटणाऱ्या जीवांचे अद्‌भुत व्हिडीओ शेअर करण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला जे ब्रुअर हातामध्ये एक लहान कासव धरलेले दिसतात, पहिल्या नजरेत ते सामान्य वाटते, पण जवळून पाहिल्यावर त्याचे दोन चेहरे स्पष्ट दिसतात. जेव्हा ते कासवाच्या तोंडाजवळ बोट नेतात, तेव्हा दोन्ही तोंडे एकाच वेळी बोट पकडण्यासाठी उघडतात. व्हिडीओ शेअर करताना जे ब्रुअर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दोन कासव, पण कवच एकच! आयुष्यभर सोबत राहायचे असल्याने त्यांना सक्तीने मित्र बनावे लागले आहे. चांगली गोष्ट म्हणजे दोघेही थोडे चिडखोर स्वभावाचे वाटतात, त्यामुळे त्यांची एकमेकांशी जमेल.‘

हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे आणि ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर युजर्स मजेशीर कमेंटस्‌ करत असून एकाने लिहिले, ‘हा निसर्गाचा चमत्कार आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने प्रश्न उपस्थित केला की, ‘शरीर एकच, पण मेंदू दोन वेगवेगळे असल्याने, कासवाला नेमके कोणत्या दिशेला जायचे आहे हे कसे ठरत असेल?’ या अनोख्या कासवाच्या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT