मॅसॅच्युसेटस् : निसर्गाच्या किमयेचे एक अजब उदाहरण अमेरिकेतील 'केप कॉड' (Cape Cod) येथे पाहायला मिळाले आहे. येथील मच्छीमारांच्या जाळ्यात एक अत्यंत दुर्मीळ असा दोन रंगांचा लॉबस्टर (खेकडा जातीचा जलचर) सापडला आहे. या खेकड्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे शरीर मध्यभागातून दोन वेगवेगळ्या रंगांत विभागलेले आहे. हा लॉबस्टर एका बाजूला सामान्य तपकिरी रंगाचा आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याचा रंग गडद केशरी आहे. डोक्यापासून शेपटीपर्यंत हा रंगांचा फरक अगदी स्पष्टपणे दिसून येतो. 'वेलफ्लीट शेलफिश कंपनी'च्या मच्छीमारांना १६ एप्रिल रोजी समुद्रात हा दुर्मीळ जीव सापडला.
सामान्यतः, असे लॉबस्टर खाण्यासाठी वापरले जातात; परंतु याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगामुळे त्याला जीवदान देण्यात आले आहे. कंपनीने हा लॉबस्टर मॅसॅच्युसेटस्मधील 'वूडस् होल सायन्स ॲक्वॅरियम' या मत्स्यालयाला दान केला आहे. सध्या हे मत्स्यालय नूतनीकरणासाठी बंद असल्याने, या लॉबस्टरला तात्पुरते 'मरीन बायोलॉजिकल लॅबोरेटरी'मध्ये ठेवण्यात आले आहे. मत्स्यालय पुन्हा सुरू झाल्यावर पर्यटकांना हा दुर्मीळ जीव पाहता येईल.
तज्ज्ञांच्या मते, दोन रंगांचा असा लॉबस्टर मिळणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. शास्त्रज्ञांनी यामागची काही कारणे सांगितली आहेत. जनुकांमधील बदलांमुळे (जीन म्युटेशन ) लॉबस्टरचा रंग बदलू शकतो. याआधी निळे, पिवळे आणि 'कॉटन कॅन्डी' रंगाचेही लॉबस्टर आढळले आहेत. दोन वेगळ्या रंगांच्या लॉबस्टरची अंडी एकमेकांत मिसळून एकच जीव तयार झाल्यामुळे असा दोन रंगांचा आकृतिबंध तयार होऊ शकतो.