न्यूयॉर्क : जगातील दुर्मीळ मानल्या जाणार्या जिन्कगो-टूथेड बीक्ड व्हेल या सुळे अर्थात दात असलेल्या देवमाशाचा शोध संशोधकांनी लावला आहे. उत्तर पॅसिफिक महासागरात प्रथमच हा जिवंत देवमासा पहिल्यांदाच आढळला आहे. अनेक वर्षांच्या शोधानंतर, उत्तर पॅसिफिक महासागरात आढळणार्या एका विचित्र प्रतिध्वनी निर्मितीचे रहस्यही या माशाच्या शोधाने उलगडले आहे. धनुष्यबाणाने घेतला डीएनए नमुना या दुर्मीळ प्रजातीच्या देवमाशाचा अभ्यास करण्यासाठी आणि तो अधिकृतपणे ओळखण्यासाठी, संशोधकांनी एका किशोरवयीन देवमाशाचा डीएनए नमुना घेण्यासाठी क्रॉसबो (धनुष्यबाणासारख्या उपकरणाचा)चा वापर केला.
या क्रॉसबाने देवमाशाला इजा न पोहोचवता त्याच्या त्वचेचा एक लहानसा तुकडा गोळा करण्यात आला. हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, यापूर्वी या देवमाशाचे अस्तित्व केवळ किनार्यांवर सापडलेल्या मृत शरीरांवरून किंवा अस्थींवरूनच ज्ञात होते. ते इतके दुर्मीळ आहेत की, वैज्ञानिक त्यांना जिवंत पाहण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. या देवमाशांकडून उत्सर्जित होणार्या विशिष्ट इकोलोकेशन पल्स (पाण्यात दिशा आणि शिकार शोधण्यासाठी वापरले जाणारे ध्वनी) चे गूढ आता या शोधानंतर उलगडले आहे. संशोधकांना आता या गूढ समुद्री जीवाच्या जीवनशैलीबद्दल, स्थलांतर मार्गांबद्दल आणि लोकसंख्येच्या स्थितीबद्दल अधिक माहिती मिळण्याची आशा आहे.